ठाणे – ठाण्यातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या नौपाड्यातील सरस्वती विद्या मंदिर ट्रस्टच्या शाळेतील मराठी माध्यम बंद होऊन इंग्रजी माध्यम सुरू होणार असल्याचा संदेश समाजमाध्यमांवर शनिवारी प्रसारित झाला होता. यानंतर पालकांनी मोठ्या संख्येने शाळेबाहेर गर्दी केली होती. तसेच मनसेच्या नेत्यांनीही धाव घेऊन प्रशासनाला जाब विचारला. दरम्यान, सोमवारी पालकांनी पुन्हा शाळेबाहेर गर्दी करत शाळा व्यवस्थापनाची भेट घेतली. त्यावेळी शाळा व्यवस्थापनाने पालकांची समजून काढली.
ठाण्यातील नौपाडा परिसरात सरस्वती मंदिर ट्रस्टची मराठी माध्यमाची शाळा आहे. ही ठाण्यातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित शाळा आहे. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये नौपाडय़ातील सरस्वती विद्यामंदिर शाळेला विशेष ओळख आहे. आपल्या पाल्याला मराठी माध्यमातून शिक्षण देण्याची इच्छा असलेल्या पालकांचा या शाळेकडे ओढा असतो. या शाळेतील मराठी माध्यम बंद होऊन इंग्रजी माध्यम सुरू होणार असल्याचा संदेश समाजमाध्यमांवर शनिवारी प्रसारित झाला होता. या संदेशानंतर पालक शाळेबाहेर जमले होते.
समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या संदेशाबाबत माहिती घेण्यासाठी पालक प्रशासनाला भेटण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, त्यांना शाळेच्या प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले होते. त्यांच्यातील संभ्रम आणखी वाढला होता. दरम्यान, मनसेचे नेते अविनाश जाधव, ठाणे शहर प्रमुख रविंद्र मोरे यांनीही शाळेत धाव घेऊन प्रशासनाची भेट घेतली होती. तसेच शाळा प्रशासन मराठी माध्यम बंद करणार असेल तर, विद्यार्थ्यांच्या पालकांना घेऊन मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला होता.
सोमवारी पुन्हा पालकांची शाळेबाहेर गर्दी
या शाळेतील मराठी माध्यम बंद होऊन इंग्रजी माध्यम सुरू होणार असल्याचा संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित झाला होता. ही केवळ अफवा असल्याचे शाळा व्यवस्थापनाने स्पष्ट केले होते. तरीही पालकांचा संभ्रम कमी झालेला नाही. त्यांनी सोमवारी सकाळी पुन्हा शाळेच्या परिसरात गर्दी केली आणि यानंतर पालक शाळा प्रशासनाला भेटले. या बैठकीत शाळा व्यवस्थापनाने पालकांची समजूत काढत विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.
शाळा व्यवस्थापनाचे नेमके म्हणणे काय ?
विद्यार्थ्यांचे हित आमच्यासाठी प्राधान्याचे आहे. शाळेत विद्यार्थ्यांना मार्शल आर्ट, नृत्य, पर्यावरण संबंधी गोष्टी म्हणजेच शेती लागवड शिकवली जाते. पालकांची इर्षा आमच्यासाठी महत्वाची नसून जे काही करू ते विद्यार्थ्यांच्या हिताचेच करू असे सरस्वती मंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांप्रती प्रेम असून त्यांचा अभिमान आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.