डोंबिवली – कल्याण शिळफाटा रस्त्याने नवी मुंबई, पनवेल भागात जाताना शिळफाटा रस्त्यावरील कोंडीमुळे प्रवाशांना रखडून राहावे लागते. दररोजच्या या कोंडीमुळे त्रस्त असलेले कल्याण, डोंबिवली परिसरातील प्रवासी शिळफाट्याऐवजी डोंबिवली मोठागाव मानकोली उड्डाणपूलमार्गे जुना कळवा-मुंब्रा टोलनाका येथून मुंब्रा बाह्यवळण रस्त्याने मुंब्रा कमानी पूल, शिळफाटा नाका येथून पनवेल, नवी मुंबईचा प्रवास करत आहेत.
डोंबिवली शहरातून पश्चिमेतील मोठागाव रेतीबंदर भागातील रेल्वे फाटक ओलांडले की वाहन चालक मानकोली पुलावरून सुसाट वेगाने मुंबई-नाशिक महामार्गाने वीस मिनीटात जुना कळवा मुंब्रा टोलनाका येथे पोहचतो. तेथून डावे वळण घेऊन वाहन चालक मुंब्रा बाह्यवळण रस्तामार्गे शिळफाट्याच्या दिशेने मुंब्रा कमानी पूल येथे पोहचतो. या कमानी पुलाजवळ डावे वळण घेऊन काही वाहन चालक महापेमार्गे नवी मुंबईत जातात. काही कमानी पूल येथे शिळफाटा चौकातून दहिसर मोरीमार्गे सरळ पनवेल दिशेने जातात.
डोंबिवलीतील दिवा-वसई रेल्वे मार्गावरील रेल्वे फाटक एकदा वाहन चालकाने ओलांडले की वाहने मानकोली पूलवरून मुंबई नाशिक महामार्ग, मुंब्रा बाह्यवळण रस्तामार्गे सुसाट वेगाने धावतात. डोंबिवलीतून शिळफाटामार्गे नवी मुंबई, पनवेल परिसरात जाण्यासाठी अनेक वेळा दोन ते तीन तास लागतात. शिळफाटा रस्त्यावर मेट्रो मार्गाची कामे सुरू आहेत. याठिकाणी अनेक भागात रस्ते अरूंद आहेत. मेट्रो कामांच्या ठिकाणी दुतर्फा वाहने अरूंद मार्गिकेतून जात असताना सतत वाहन कोंडी होते. शिळफाटा कोंडीतून बाहेर पडण्यासाठी अनेक वेळा प्रवाशांना पाऊण ते एक तास लागतो. या कालावधीत एखादे वाहन शिळफाटा रस्त्यावर बंद पडले तर शिळफाटा रस्त्यासह आजुबाजुचे पोहच रस्ते वाहन कोंडीने गजबजून जातात. या कोंडीतून चार ते पाच तासानंतर प्रवाशांची सुटका होते.
शिळफाटा रस्त्याचा काटई, निळजे ते देसाई, खिडकाळी भाग सोडला तर उर्वरित रस्त्याचे सहा पदरीकरण आणि सीमेंट काँक्रिटीकरण झाले आहे. सहा पदरी मार्गिकेतून वाहने सुसाट वेगाने धावतात. काटई, निळजे, देसाई या भागातील चार पदरी मार्गिकेत वाहने आली की या भागात वाहन कोंडी होते. या भागातील रस्ते बाधित शेतकऱ्यांना भरपाई देण्यास शासनाने वेळकाढूपणा चालविल्याने त्याचा फटाक प्रवाशांना बसत आहे. मेट्रोची कामे लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. पलावा चौक पूल लवकर होण्याची शक्यता नाही.
काटई ते खिडकाळी रस्ता रूंदीकरण होत नाही तोपर्यंत शिळफाटा रस्त्यावरील कोंडी सुटण्याची शक्यता नाही. हा विचार करून या कोंडीमुळे डोकेदुखी करून घेण्यापेक्षा नवी मुंबई, पनवेल, उरण, अलिबाग भागात जाणारे डोंबिवली,कल्याण भागातील बहुतांशी नोकरदार, व्यावसायिक फेरा पडत असला तरी मानकोली, मुंबई नाशिक महामार्गा, मुंब्रा बाह्यवळण रस्ता ते मुंब्रा कमानी पूल मार्गाला पसंती देत आहेत. हा प्रवास विना अडथळा दीड ते दोन तासात पूर्ण होत असल्याने प्रवासी समाधानी आहेत. ओला, उबर वाहन चालकही शिळफाटा कोंडी टाळण्यासाठी या नवीन मार्गाला पसंती देत आहेत.