शहापूर : किराणा दुकानातील पिठाच्या गोण्या रिक्षामध्ये नीट ठेवण्यावरील किरकोळ वादातून परप्रांतीय कामगाराने रिक्षाचालकाच्या डोक्यात धान्य मोजण्याच्या मापाने मारहाण केली. या मारहाणीत रिक्षाचालकास गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी मारहाण करणाऱ्यास अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

शहापूर येथील एका किराणा स्टोअर्सच्या मालकाच्या सांगण्यावरून रिक्षाचालक गणपत गोरे हे ही दुसऱ्या किराणा दुकानात सामान घेण्यासाठी आले होते. दुकानातील कामगार पिठाच्या गोण्या रिक्षेत चढवत असताना “गोण्या रिक्षामध्ये व्यवस्थित टाका” असे रिक्षाचालक गोरे यांनी सांगितल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला. यावरून संतापलेल्या कामगाराने शिवीगाळ करत रिक्षाचालच्या डोक्यात धान्य मोजण्याच्या मापाने घालत त्यांना मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर शहापूर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या व्यक्तीस अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी रिक्षाचालकाची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.