ठाणे : ठाणे, मिरा-भाईंदर तसेच भिवंडी महापालिका क्षेत्रासह ग्रामीणच्या काही भागाचा पाणी पुरवठा मंगळवारऐवजी शुक्रवार, २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचा निर्णय स्टेम प्राधिकरणाने घेतला आहे. मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात जलवाहिनी तातडीच्या दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर पाणी कपात असून त्यात पाणी बंदमुळे आणखी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. उदंचन केंद्रातील वीज मीटर बदलण्याचे तसेच जलवाहीनीची गळती बंद करण्याच्या कामासाठी हा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.
ठाणे, मिरा-भाईंदर तसेच भिवंडी महापालिका क्षेत्रासह ठाणे ग्रामीणच्या काही भागात स्टेम कंपनीकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. स्टेमच्या शहाड येथील अशुध्द जल उदंचन केंद्रावर वीज मीटर बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासोबतच शहाड येथील अशुध्द जल उदंचन केंद्र येथील जल वाहिनीवर गळती होत असून त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी २२ जुलै रोजी ठाणे, मिरा-भाईंदर तसेच भिवंडी महापालिका क्षेत्रासह ठाणे ग्रामीणच्या काही भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय स्टेम प्राधिकरणाने घेतला होता. या निर्णयानंतर मिरा-भाईंदर महापालिकेने स्टेम प्राधिकरणाला पत्र पाठवून हा बंद रद्द करून तो पुढे ढकलण्याची मागणी केली होती.
बंद पुढे का ढकलला
मिरा-भाईंदर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी स्टेम प्राधिकरणाला एख पत्र पाठविले होते. त्यात १९ जुलै रोजी सकाळी ८ ते २० जुलै रोजी सकाळी ८ यावेळेत हटकेश येथील मुख्य ९०० मी.मी व्यासाच्या जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम सुरु होते. त्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बंद असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या परीस्थितीत स्टेम प्राधिकरणाकडून पाणी बंद ठेवण्यात आल्यास मीरा-भाईंदर शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा बंद पुढे ढकलावा, अशी मागणी पत्रात करण्यात आली होती. त्यानुसार स्टेम प्राधिकरणाने हा बंद पुढे ढकलला आहे.
पाणी केव्हा बंद राहणार
स्टेम प्राधिकरणाने मंगळवारचा पाणी बंदचा निर्णय रद्द करत शुक्रवार, २५ जुलैा रोजी सकाळी ९ ते शनिवार, २६ जुलै रोजी ९ वाजेपर्यंत पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात ठाणे, मिरा-भाईंदर तसेच भिवंडी महापालिका क्षेत्रासह ग्रामीणच्या काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
ठाण्याच्या कोणत्या भागात पाणी नाही
स्टेम प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा बंद असेल त्या दिवशी शहरात टंचाई निर्माण होऊ नये यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनाने स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करुन टप्याटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवणार आहे. त्यानुसार घोडबंदर रोड, पातलीपाडा, बाळकुम, ब्रम्हांड, पवार नगर, कोठारी कम्पाउंड, डोंगरी पाडा, वाघबीळ इत्यादी ठिकाणाचा पाणी पुरवठा शुक्रवार, २५ जुलै रोजी सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत बंद राहील. तर, समतानगर, ऋतु पार्क, सिध्देश्वर, इटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेती बंदर, कळवा व मुंब्र्याचा काही भाग येथे शुक्रवार, २५ जुलै रोजी रात्री ९ ते शनिवार, २६ जुलै रोजी सकाळी ९ यावेळेत बंद राहील. या बंदमुळे पाणीपुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता पालिकेने व्यक्त केली आहे.