ठाणे : हिरानंदानी इस्टेट येथील विकासकाने येथील रहिवाशांना अनेक वर्ष टाऊनशिपच्या नावाखाली नागरी सुविधांपासून वंचित ठेवले आहे. या विकासकावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी नगरविकास विभागाकडे केल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.

हिरानंदानी इस्टेट येथील विकासकाने येथील रहिवाशांना अनेक वर्ष टाऊनशिपच्या नावाखाली नागरी सुविधांपासून वंचित ठेवले आहे. ज्या मैदानात विकासक मॅरेथॉन घेतो, त्याच मैदानात स्थानिक रहिवाशांना खेळू दिले जात नाही. मोकळ्या भूखंडावर क्लब हाऊस, ॲम्पी थिएटर उभारले जाऊ शकते. मात्र टाऊनशिपचे नाव घेत या सुविधांपासून रहिवाशांना वंचित ठेवले जात आहे. या विकासकावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी नगरविकास विभागाकडे केल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले. तसेच टाऊनशिप पूर्ण व्हायला अजून २५ वर्ष जातील, तोवर रहिवाशांना वाऱ्यावर सोडले जाणार का असा प्रश्न खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला. या संदर्भात ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली असून त्यांना नगरविकास खात्याचे सचिव असिम गुप्ता यांना नागरी सुविधांबाबत पत्रव्यवहार करण्याची सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हिरानंदानी इस्टेट फेडरेशनची कमिटी, शाखाप्रमुख प्रवीण नागरे उपस्थित होते.

थोड्याशा पावसाने माजिवाडा येथील लोढा पॅराडाईज गृहसंकुलातील १३ इमारतींच्या तळमजल्यामध्ये नाल्यातून येणारे पाणी १० फुट तुंबते. यामुळे रहिवाशांच्या गाड्यांचे अतोनात नुकसान होते. यावेळी रहिवाशांनी एक सादरीकरण आयुक्तांपुढे करत रुस्तमजी विकासकाने चुकीच्या पध्दतीने केलेले बांधकाम आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. लोढा बिल्डरने सुविधा म्हणून दिलेले टेनिस कोर्ट आता डीपी रस्त्यात येत आहे. बिल्डरच्या विरोधात यावेळी रहिवाशांनी फसवणूक झाल्याची तक्रार केली. रहिवाशांना त्रास न देता हा डीपी रोड ४ मीटरने वाढविण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली. आयुक्त सौरभ राव यांनी सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्या पूर्ण करण्याचे आश्वासन खासदार नरेश म्हस्के यांना दिले.

कामगारांच्या मागण्या

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरळसेवा भरतीने सामावून घेणे, डाटा एन्ट्री कामगारांचे मानधन वाढविणे, सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन, पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी त्वरित देणे, आदी विविध प्रश्नांवर आज खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा केली. आयुक्तांनी सर्व मागण्यांवर सकारत्मकता दाखवत मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.