ठाणे : तीन हात नाका भागातून मुलूंडच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाच्या मध्यभागी मेट्रोची मार्गिका उभारण्यात आलेली असली तरी ठाण्याहून मुलुंडच्या दिशेने जाणारी मार्गिका अरुंद तर, मुलुंडहून ठाण्याकडे येणारी मार्गिका रुंद दिसत आहे. मुलुंड दिशेने जाणाऱ्या मार्गिकेलगत बांधकामे आणि बेकायदा टपऱ्या असून यामुळे ही मार्गिका निमळुती झाल्याने येथे कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून भविष्यात ही समस्या आणखी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.

ठाणे शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणून तीन हात नाका चौक ओळखला जातो. पूर्व द्रुतगती महामार्गावरील हा चौक वाहतुकीमुळे अतिशय गजबजलेला असतो. या चौकाला चार सेवा रस्ते, सहा मुख्य जोडण्यात आले आहेत. ठाणे स्थानक तसेच मुंबई शहरातील वाहतूकीसाठी हा मार्ग महत्वाचा मानला जातो. या मार्गावरून ठाणे, घोडबंदर, मुंबई उपनगर, मुलुंड, भांडूप, वागळे इस्टेट भागातील नोकरदार वर्ग वाहतूक करतो. या भागात काही शासकीय तसेच खासगी कंपन्यांची कार्यालये, माॅल आहेत. याशिवाय, लोकवस्ती आणि महाविद्यालय आहे. यामुळे दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी या भागातून पायी ये-जा करतात. काही दिवसांपूर्वीच याच चौकाजवळ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशे यांना एका बसगाडीने धडक दिली होती. त्यानंतर बसगाडी चालकाने त्यांना वैद्यकीय मदत करण्याऐवजी तेथून पळ काढला.

अपघातात आगाशे यांचा मृत्यू झाल्यानंतर परिसरातील पादचारी आणि वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच, येथील बेकायदा टपऱ्या आणि बांधकामांमुळे होणाऱ्या कोंडीचा मुद्दा देखील उपस्थित होऊ लागला आहे. येथील मुलुंड, वागळे इस्टेटच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवरील इटर्निटी परिसरात सेवा रस्ता आणि मुख्य रस्त्या लगत मोठ्याप्रमाणात अनधिकृत टपऱ्या, गाळे आणि उपाहारगृह उभारण्यात आले आहेत. या बांधकामांमुळे ठाणे स्थानकाहून मुलुंड चेक नाक्याच्या दिशेने जाणारी मार्गिका निमुळती झाली आहे. यामुळे सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत याठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

या चौकात सर्वाधिक टपऱ्या या लांब पल्ल्याच्या ठिकाणी जाणाऱ्या खासगी बसगाड्यांच्या आसन नोंदणीच्या आहेत. दिवसभर या टपऱ्यांवर बसगाड्यांमध्ये आसन व्यवस्थेच्या नोंदणीसाठी नागरिक गर्दी करतात. त्यांची वाहनेही या टपऱ्यांजवळ उभी असतात. त्यामुळे येथून वाहतुक करणाऱ्या नागरिकांना अतिशय अरुंद मार्गिका उपलब्ध होते. याच मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या उभारणीचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी मेट्रोची मार्गिका उभारण्यात आली आहे. तरीही ठाण्याहून मुलूंडच्या दिशेने जाणारी मार्गिका अरुंद तर, मुलुंडहून ठाण्याकडे येणारी मार्गिका रुंद दिसत आहे. मुलुंड दिशेने जाणाऱ्या मार्गिकेलगत बांधकामे आणि बेकायदा टपऱ्या असून यामुळे ही मार्गिका निमुळती झाल्याने येथे कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत महापालिकेचे नौपाडा-कोपरी प्रभागाचे साहाय्यक आयुक्त सोपान भाईके यांना विचारले असता, बांधकामांबाबतची माहिती घेऊन सांगतो असे त्यांनी स्पष्ट केले.