देवराम भोईर यांना पाठिंब्याची खेळी पक्षाच्या अंगलट; राष्ट्रवादीचाही तील मोठा गट नाराज

ठाणे महापालिकेच्या ढोकळी प्रभागातील पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप युतीसह काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी ऐनवेळेस नाटय़मयरीत्या घेतलेल्या माघारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते देवराम भोईर यांचा विजय सुकर झाला. मात्र निवडून येताच त्यांनी दाखविलेल्या शिवसेनाप्रेमामुळे त्यांना पाठिंब्याचा खटाटोप करणारे काँग्रेस नेते आता अडचणीत आले आहेत.
राष्ट्रवादीचे नेते असले तरी सर्वपक्षीयांचा पाठिंबा मिळविण्यासाठी देवराम यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. राष्ट्रवादीला पाठिंबा देत असल्याचे बालंट आपल्यावर येऊ नये यासाठी शिवसेना-भाजपच्या स्थानिक नेत्यांनीच पद्धतशीरपणे ही खेळी खेळली. शिवसेनेने तयार केलेल्या संहितेवर हे सगळे नाटय़ रंगत असूनही काँग्रेसमधील काही मांडवलीबहाद्दर नेत्यांनी संपूर्ण पक्षच देवराम आणि शिवसेनेमागे फरफटत नेल्याने पक्षाचा मुखभंग झाला आहे.
दरम्यान, बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट होताच देवराम यांनी शिवसेना शाखेत जाऊन दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला. यावेळी खासदार राजन विचारे यांनीही त्यांच्या खांद्यावर भगवी शाल घातली आणि पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत बदलत्या राजकारणाचे एक प्रकारे संकेत दिले. देवराम यांचे पुत्र संजय भोईर हे ठाणे महापालिकेत विरोधी पक्षनेते आहेत. असे असताना शिवसेना शाखेत जाऊन पक्षाचे उपरणे आणि भगवी शाल खांद्यावर खेळविण्याच्या देवराम यांच्या कृतीमुळे राष्ट्रवादीमधील पक्षातील नगरसेवकांचा मोठा गट अस्वस्थ झाला आहे. शिवसेनेने देवराम यांना शाखेत नेऊन राष्ट्रवादीतील गटातटाचे राजकारण तीव्र करताना काँग्रेसचा मुखभंग करून एकाच दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा रंगली आहे.
शिवसेना नगरसेवक लॉरेन्स डिसोझा यांचे पद रद्द झाल्याने या प्रभागात येत्या १७ एप्रिल रोजी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम ठरला होता. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेना आणि कॉंग्रेस या प्रमुख राजकीय पक्षासह अपक्ष अशा पाच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे देवराम भोईर यांची बिनविरोध निवड झाली. भोईर यांनी आपले दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारी अर्जावर भरलेली उमेदवारी त्यांनी मागे घेतली आणि अपक्ष अर्ज कायम ठेवला. या प्रभागात शिवसेनेतर्फे भारतीय विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संघटक सुनील पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर काँग्रेसने तन्मय भोईर यांना उमेदवारी दिली होती.

काँग्रेस तोंडघशी
पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने तन्मय भोईर यांना उमेदवारी जाहीर केली होती. गेल्या काही महिन्यांपासून देवराम भोईर कुटुंबीयांची शिवसेनेसोबत जवळीक वाढल्याने या निवडणुकीत शिवसेना माघार घेईल, असा अंदाज सुरुवातीपासूनच बांधला जात होता. त्यामुळे काँग्रेसमधील एक मोठा गट ही पोटनिवडणूक लढविण्यासाठी आग्रही होता. असे असताना ऐनवेळेस देवराम यांच्यासाठी पक्षाच्या उमेदवाराला माघार घ्यायला कुणी लावली, असा सवाल आता उपस्थित होत आहे. दरम्यान, शहर अध्यक्षाच्या अनुपस्थितीत पक्षाच्या शहर समितीने हा निर्णय घेतला होता. त्यामुळे ठरावीक नेत्यांनी देवराम यांना पाठिंबा देत उमेदवार मागे घेतल्याची चर्चा निर्थक आहे, असा दावा पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने केला.

राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेत जल्लोष
कॉंग्रेसने उमेदवार उभा केल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली होती. अखेर शुक्रवारी सकाळी झालेल्या नाटय़मय घडामोडीनंतर सर्वच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेचे कार्यकर्ते जल्लोष करताना दिसल्याने ही खेळी काँग्रेसच्या नेत्यांच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.