ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबविण्यात येत असून या सर्व प्रकल्पांचा समावेश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.ठाणे महापालिका क्षेत्रातून मुंबई-नाशिक आणि घोडबंदर मार्ग जातो. या मार्गावरून शहरातील नोकदार वर्गाची वाहने वाहतूक करतात. याशिवाय, या मार्गावरून जेएनपीटी बंदर, गुजरात, नाशिक अशी अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. या वाहनांची संख्याही मोठी आहे.
मुंबई-नाशिक आणि घोडबंदर मार्गावर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असल्यामुळे हा रस्ता अंरुद झाला आहे. त्याचबरोबर शहरातील वाढत्या नागरिकरणामुळे वाहनांच्या संख्येतही वाढ होत आहे. यामुळे दोन्ही मार्गांवर कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. यामध्ये ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग, मेट्रो स्थानकांच्या परिसरात पादचारी पुलांची उभारणी, घोडबंदर मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी, घाटकोपर ते ठाणे पुर्व मुक्त मार्ग, आनंदनगर ते साकेत उन्नत मार्ग अशा प्रकल्पांचा समावेश आहे. यापैकी काही प्रकल्पांचे आराखडे तयार करून देण्याचे काम ठाणे महापालिकेने केले होते. तर, या प्रकल्पांसाठी भुसंपादन करण्याचे काम पालिका करीत आहे. तर, या प्रकल्पांच्या उभारणीसाठी येणारा खर्च एमएमआरडीएमार्फत करण्यात येत आहे. असे असतानाच, या सर्व प्रकल्पांचा समावेश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.
खासगी लोकसहभागातून विकासाचे स्वप्न
ठाणे महापालिका क्षेत्रातील काही प्रकल्प खासगी लोकसहभागातून (पीपीपी) राबविण्याची घोषणा प्रशासनाने अर्थसंकल्पात केली आहे. कोलशेत येथील २५ एकर जागेत ॲम्युजमेंट व स्नो पार्क, दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्टस् क्लब, कॅडबरी जंक्शन येथील २१०५ चौरस मीटरच्या भुखंडावर इनडोअर स्पोर्टस् क्लब, वाचनालय आणि अभ्यासिका, कोलशेत येथे ठाणे टाऊन पार्क, मोघरपाडा येथे व्हीविंग टाॅवर ॲण्ड कन्व्हेंशन सेंटर असे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत फारसा निधी नसलेल्या पालिकेने खासगी लोकसहभागातून विकासाचे स्वप्न दाखविल्याची चर्चा रंगली आहे.