ठाणे : ठाण्यातील २० वर्ष जुन्या स्वामी समर्थांच्या मठावर ठाणे महापालिकेने कारवाई केली आहे. या कारवाईमुळे स्वामी समर्थांच्या भक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी देखील एकत्र येत महापालिकेच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला. येत्या सोमवारी कॅडबरी नाका ते ठाणे महापालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. हा मोर्चा कोणत्याही पक्षाचा नसून स्वामी भक्तांचा असेल असेही स्पष्ट करण्यात आले. कारवाईपूर्वी याठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात झाला होता.
घोडबंदर येथील आनंदनगर भागात स्वामी समर्थांचे २० वर्ष जुने मठ आहे. हे मठ म्हाडाच्या जागेत असून अनेक वर्षांपासून या जागेवरून वाद सुरु आहे. हजारो नागरिक येथे दर्शानासाठी येत असतात. येथे बालसंस्कार तसेच इतर उत्सव देखील मोठ्याप्रमाणात साजरे होतात. येथे उद्यान उभारले जाणार असल्याने येथील मठावर कारवाई करण्यास ठाणे महापालिकेने सुरुवात केली आहे. कारवाईची माहिती मिळताच स्वामी समर्थ भक्तांकडून तीव्र संताप व्यक्त केला. हे खूप जुने मठ आहे. हे मठ हलविल्यास नागरिक रस्त्यावर उतरतील असे एका भाविकाने सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) मनोज प्रधान यांनी सांगितले की, मी स्वामींचा भक्त म्हणून येथे आलो होतो.
आम्ही महापालिकेवर धडक मोर्चा काढणार असून सर्व पक्षीय स्वामी भक्त यामध्ये सहभागी होणार आहे. हे कोणाच्या सांगण्यावरून सुरु आहे आम्हाला माहीत आहे. शहरातील उद्याने आधी सुधारा आणि मग येथे या असे प्रधान यांनी सांगितले. आम्ही सोमवारी कॅडबरी जंक्शन येथे जमणार असून कॅडबरी ते ठाणे महापालिका असा मोर्चा निघेल असा इशारा त्यांनी दिला. या मोर्चानंतर आयुक्तांसोबत चांगली चर्चा घडेल असा विश्वास आहे असेही त्यांनी सांगितले. ठाकरे गटाचे प्रदीप पुर्णेकर यांनी सांगितले की, ठाण्यातील उद्यानात गर्दुल्ले फिरतात. उद्यान बनले आहेत तिथे लक्ष दिले जात नाही. ठाण्यात अमली पदार्थ सर्रास मिळतात. या मठात चांगले उपदेश मिळत असताना येथे कारवाई केली जात आहे. येथे मुस्लिम समाजाचे लोक देखील येतात. येथे कोणतीही जात धर्म पाहिले जात नाही असे त्यांनी सांगितले.
महापालिका उपायुक्त मनीष जोशी हे देखील येथे उपस्थित होते. त्यांना स्वामी भाविकांनी विनंती करत ही कारवाई करु नका अशी मागणी केली.
ही जागा म्हाडाची आहे. येथे एक उद्यानासाठी रितसर काम देण्यात आले आहे. ही महापालिकेची कारवाई नव्हती. येथील मठ इतर ठिकाणी स्थलांतरित केले जाणार आहे असे स्पष्टीकरण उपायुक्त मनीष जोशी यांनी दिले.
