ठाणे : एका बांधकाम व्यावसायिकाकडून लाच घेतल्याप्रकरणी ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह दोन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या कारवाईनंतर ठाणे महापालिकेच्या कारभाराव टिका होत असतानाच, आयुक्त सौरभ राव यांनी शनिवारी शंकर पाटोळे यांना सेवेतून निलंबित केले. त्यांच्याकडील अतिक्रमण विभागाचा पदभार उपायुक्त उमेश बिरारी यांच्याकडे देण्यात आला आहे.

ठाणे महापालिका अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. पालिकेच्या वर्धापन दिनीच ही कारवाई झाली होती. जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी मुंबईतील एका बांधकाम व्यवसायिकाकडून त्यांनी ५० लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. त्यापैकी २५ लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना पाटोळे आणि त्यांचा सहकारी ओमकार गायकर यांना पथकाने पकडले होते. याप्रकरणी उपायुक्त शंकर पाटोळे, महापालिकेत डेटा ऑपरेटर पदावर काम करणारा ओमकार गायकर आणि सुशांत सुर्वे या तिघांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर सुशांत यालाही अटक करण्यात आली होती. या कारवाईनंतर पालिकेच्या कारभारावर सर्वत्र टिका होत होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईची गंभीर दखल घेऊन शंकर पाटोळे यांना २ ऑक्टोबरपासून महापालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. त्याबद्दलचा आदेश शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी जारी केला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४ च्या अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करुन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी उपायुक्त शंकर पाटोळे यांना निलंबित केले आहे. पाटोळे यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाईही सुरू करण्यात आलेली आहे.

उमेश बिरारींकडे अतिक्रमण विभागाची सुत्रे

ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभाग, सचिव विभाग, निवडणुक विभाग, माहिती व जनसंपर्क विभागाची जबाबदारी आहे. या विभागांसह आता अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली आहेत. तर, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग, मालमत्ता कर विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि क्लस्टर सेलची जबाबदारी आहे. त्यांच्याकडील क्लस्टर सेलचा विभाग काढून तो उपायुक्त दीपक झिंजाड यांच्याकडे देण्यात आला आहे. याशिवाय, पाटोळे यांच्याकडे असलेला परिमंडळ २ चा कार्यभारही देण्यात आला आहे.