शिवसेनेला कोंडीत गाठण्यासाठी पवारांची खेळी
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाणे आणि कल्याण, डोंबिवली या शहरांच्या बकाल अवस्थेकडे बोट दाखवून शिवसेनेच्या नाकर्तेपणावर निशाणा साधण्यात यशस्वी ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता पुन्हा एकदा तोच फॉम्र्युला ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत प्रचारास अमलात आणला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कळवा आणि वागळे इस्टेट येथे घेतलेल्या जाहीर सभांमध्ये ठाणे शहरातील दुरवस्थेवर टीकास्त्र सोडताना राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या नवी मुंबई आणि पिंपरी-चिंचवड या महापालिकांच्या क्षेत्रातील विकासाचे गोडवे गायले. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी वाटप करताना राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील नेते गणेश नाईक यांनी केलेल्या हस्तक्षेपाचा मुद्दा गाजला असताना पक्षाने प्रचारादरम्यान मात्र, नाईक यांचे वर्चस्व असलेल्या नवी मुंबईचा वापर करून घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
देशात असलेली नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची लाट, राज्यात झालेले सत्तांतर असे विरोधी वारे वाहत असतानाही दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने नवी मुंबई महापालिकेतील आपली सत्ता कायम राखली. त्या वेळी गणेश नाईक यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी ठाणे आणि कल्याण, डोंबिवली या सेनेच्या आधिपत्याखाली असलेल्या शहरांच्या बकालीकरणाचा मुद्दा जोरकसपणे उचलून धरला होता. त्यामुळे शिवसेना-भाजपची युती असताना आणि राजकीय परिस्थिती विरोधात असतानाही नाईक यांनी काँग्रेसच्या मदतीने नवी मुंबईतील सत्ता कायम राखण्यात यश मिळवले होते. याचे मोठे श्रेय नवी मुंबई व ठाणे या शहरांच्या तुलनेला दिले जाते. हाच धागा पकडून आता राष्ट्रवादीने ठाण्याच्या प्रचारात नवी मुंबईतील विकासकामांचे गोडवे गाण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार यांनी कळवा आणि वागळे इस्टेट येथे घेतलेल्या जाहीर सभांमधील भाषणांमध्ये ही बाब प्रकर्षांने दिसून आली.
उमेदवार ठरविताना कळव्यातील एका जागेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईक यांच्यात वाद उभा राहिल्याचे चित्र मध्यंतरी दिसून आले. राष्ट्रवादीने कळवा येथे आयोजित केलेल्या सभेत शरद पवार आणि आव्हाड या दोन नेत्यांचे छायाचित्र असलेले पोस्टर तयार केले होते. व्यासपीठावर गणेश नाईक, वसंत डावखरे या दोन नेत्यांना स्थान दिले असले तरी कळव्यात पक्षाच्या बॅनरवर या दोन नेत्यांची छबी वापरण्यात आली नसल्याने यासंबंधीची चर्चा रंगली होती. असे असले तरी पवार यांनी भाषणात मात्र नवी मुंबईतील विकासाचे गोडवे गाताना ठाण्याच्या बकालीकरणाला शिवसेना जबाबदार असल्याची टीका केली.
नवी मुंबईच्या विकासाचा पाढा
नवी मुंबई महापालिकेने उभारलेले धरण, करांमध्ये न झालेली वाढ तसेच परिवहन व्यवस्थेचे सक्षमीकरणाचा पाढा पवार यांनी ठाण्यातील प्रचारसभांमध्ये वाचला. ज्या शहरांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे तेथे बकालीकरण ठरले असल्याची टीका करताना नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवडच्या विकासाचा उदोउदो या वेळी करण्यात आला. वागळे इस्टेट येथील सभेतही नवी मुंबईसारखा विकास करायचा असेल तर राष्ट्रवादीला निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले.