Thane municipal corporation election 2025 : ठाणे : येत्या काही महिन्यात होणाऱ्या ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रारुप प्रभाग रचना आराखड्यावर २ सप्टेंबरपर्यंत केवळ १६ हरकती व सुचना नागरिकांनी दाखल केल्या आहेत. गणेशोत्सवात अनेकजण व्यस्त असल्यामुळे तक्रारींचा ओघ कमी असल्याचे बोलले जात होते. मात्र, गौरी-गणपती विसर्जन होताच, या उत्सवातून उसंत मिळालेल्या नागरिकांनी एकाच दिवसात म्हणजे ३ सप्टेंबर रोजी ४४ तक्रारी दाखल केल्या आहेत. यामुळे तक्रारींची संख्या ६० इतकी झाली आहे.

ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत ६ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे येत्या काही महिन्यात पालिकेची निवडणूक होणार आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने प्रारुप प्रभाग रचना तयार करून प्रसिद्ध केली आहे.

गेल्या म्हणजेच २०१७ साली झालेल्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना होती. त्यात ३२ प्रभाग चार सदस्यांचे तर, एक प्रभाग तीन सदस्यांचा होता. अशी एकूण ३३ प्रभागातून १३१ नगरसेवक निवडुण आले होते. यंदाच्या निवडणुकीत हीच रचना कायम ठेवण्यात आल्याने प्रभाग आणि नगरसेवक संख्येत वाढ झालेले नाही. यात चार सदस्यांच्या प्रभाग रचनेत ५० ते ६२ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग तयार करण्यात आला आहे. तर, तीन सदस्यांचा प्रभाग ३८ हजार लोकसंख्येचा करण्यात आला आहे. या प्रारुप आराखड्यावर महानगरपालिकेने नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. हरकती व सूचना सादर करण्यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे.

केवळ १६ तक्रारीच

प्रारुप प्रभाग आराखडा जाहीर होताच, त्याविरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. विविध प्रभागातही सीमावादाबाबत काही तक्रारी होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल होतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात मात्र आराखड्यावर २ सप्टेंबरपर्यंत केवळ १६ हरकती व सुचना नागरिकांनी दाखल केल्या होत्या. गणेशोत्सवात अनेकजण व्यस्त असल्यामुळे तक्रारींचा ओघ कमी असल्याची शहरात चर्चा होती.

एका दिवसात ४४ तक्रारी

गौरी-गणपतीचे २ सप्टेंबर रोजी विसर्जन झाले, त्याची संख्या मोठी होती. गौरी आणि गणपती विसर्जनाच्या सातव्या दिवशी ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर एकूण १७९३९ मूर्तींचे विसर्जन झाले. त्यात, १६९४४ गणेश मूर्ती तर, ९९५ गौरी मूर्ती होत्या. त्यात, १२७ सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तींचाही समावेश होता. या विसर्जनानंतर गणेशोत्सवातून उसंत मिळालेल्या नागरिकांनी आता तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली असून एकाच दिवसात म्हणजे ३ सप्टेंबर रोजी ४४ तक्रारी दाखल केल्या आहेत. यामुळे तक्रारींची संख्या ६० इतकी झाली आहे.

या तक्रारी कोणत्या प्रभागांसाठी आहेत आणि तक्रारींचे स्वरुप काय हे मात्र समजू शकलेले नाही. अर्ज दाखल करण्याची आज, ४ सप्टेंबर ही अंतिम मुदत असून या दिवशी मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.