ठाणे : ठाणे शहराचा वेगाने होणारा विकास लक्षात घेऊन घोडबंदर येथील भाईंदरपाडा भागात नोकरदार महिलांसाठी वसतीगृह उभारणीचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या वसतीगृहाच्या बांधकामासाठी ५० कोटींचा निधी देण्याची घोषणा करत या कामासाठी निविदा प्रकिया राबविण्याचे आदेश दिले आहेत. वसतीगृहासाठी तळ अधिक ९ मजली इमारत उभारून त्यात ४०२ महिलांकरिता राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. शहरात रस्ते प्रकल्पांसह मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबई शहराला ठाणे शहर जोडण्यात आले आहे. त्याचबरोबर ठाण्यातही आयटी पार्क उभे राहत आहेत. तसेच शहरात औद्योगिक कारखानेही आहेत. दुसऱ्या शहरातून अनेक महिला नोकरीनिमित्ताने येथे येतात. त्यांना नोकरीनिमित्ताने दररोज लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागतो. अशा नोकरदार महिलांसाठी वसतीगृह उभारणीचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला असुन यासंबंधीच्या प्रस्तावास ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे.

या प्रस्तावानुसार, घोडबंदर येथील भाईंदर पाडा भागातील मे. पुराणिक बिल्डर्स प्रा. लि यांनी महापालिकेच्या नावे केलेल्या सुविधा भुखंडावर नोकरदार महिलांसाठी वसतीगृह उभारण्यात येणार आहे. या वसतीगृहासाठी तळ अधिक नऊ मजली इमारत उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये एकूण ४०२ महिलांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये पुरेशी वाहनतळ व्यवस्था, फुड कोर्ट, व्यायाम शाळेकरीता पुरेशी जागा, या सुविधांचा अंर्तभाव असणार आहे. या नियोजित इमारतीचे बांधकाम क्षेत्र ४५२३ चौ.मी इतके असून इमारत बांधकामाकरीता एकूण ५० कोटी रुपयांचा खर्च आहे. हा निधी देण्याची घोषणा करत या कामासाठी निविदा प्रकिया राबविण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार, पालिकेने या वसतीगृहाच्या बांधकामाचा प्रस्ताव तयार करून त्यास मान्यता दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरांमधील भविष्यकालीन सर्व प्रकारच्या गरजा पुर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून मुलभूत पायाभुत सुविधा उपलब्ध करणे, दळणवळणाची साधने निर्माण करणे आणि शहरात येत असलेल्या नागरिकांसाठी आवश्यक इतर सुविधा निर्माण करण्याची कार्यवाही ठाणे महापालिकेकडून करण्यात येत आहे. नागरिकांच्या सुविधेकरिता काही योजनासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून निधी देण्यात येतो. अशाच प्रकारे समाजविकास विभागाने भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजनेंतर्गत अर्थसहाय्य मिळविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी यासंबंधीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून पाठविला होता. त्यात महिला वसतीगृहाचा समावेश होता.