Thane illegal construction : ठाणे – ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणात ९०९ बेकायदा बांधकामे आढळून आली असून त्यापैकी २२७ बांधकामे पाडण्याची कारवाई करण्यात आली आहे. सण-उत्सवाच्या बंदोबस्तात पोलिस यंत्रणा व्यस्त असल्याने उर्वरित ६८२ बेकायदा बांधकामांवर गणेशोत्सवानंतर हातोडा मारण्याची कारवाई केली जाणार आहे. असे असले तरी, या कारवाई आधी या बांधकामांचा वीज, पाणी पुरवठा खंडीत करण्याबरोबरच नोटीस देण्याची प्रक्रीया पुर्ण करण्याचा निर्णय पालिका प्रशानसाने घेतला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून भुमाफियांकडून बेकायदा बांधकामे उभारण्यात येत आहेत. यातील काही बांधकामांची प्रकरणे उच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्यामध्ये शीळ येथील खान कंपाऊंडमधील २१ बेकायदा इमारतींचाही समावेश होता. न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना स्वत: जाऊन ही बांधकामे पाडावी लागली होती. यावरून पालिका प्रशासनाच्या कारभारावर टिका झाली होती.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.जी.बन्साली यांच्यामार्फत बेकायदा बांधकामांची चौकशी सुरू आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी ठाणे महापालिकेने विशेष मोहीम सुरू केली असून यात बेकायदा बांधकामे तोडण्यात येत आहेत. याशिवाय, ठाणे महापालिकेकडूनही शहरातील बेकायदा बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या बेकायदा बांधकामांच्या माहितीचा अहवाल नुकताच उच्च न्यायालयात सादर झाला आहे. या अहवालानुसार, ठाण्यात ९०९ बेकायदा बांधकामे असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यात, सर्वाधिक ७४० बेकायदा बांधकामे ही दिवा, शीळ आणि मुंब्रा पट्टयातील आहेत.
गणेशोत्सवानंतर कारवाई
बेकायदा बांधकामे पाडताना नागरिकांचा विरोध होतो. काही वेळेस पथकावर हल्लेही होतात. यामुळे अशा बांधकामांवर पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात येते. परंतु सण-उत्सवाच्या काळात बंदोस्ताच्या कामात पोलिस यंत्रणा व्यस्त असते. त्यामुळे या काळात बेकायदा बांधकामांच्या कारवाईसाठी बंदोबस्त देणे पोलिस यंत्रणेला शक्य होत नाही. सण-उत्सवांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात पोलिस बंदोबस्त तैनात केला जातो. या काळात पोलिसांना अधिक सर्तक रहावे लागते. त्यामुळे गणेशोत्सवानंतरच बांधकामांवर कारवाई सुरू होणार आहे, अशी माहिती पालिका प्रशानसाने दिली.
वीज, पाणी पुरवठा तोडला जाणार
पोलिस बंदोबस्ताविना कारवाई करणे शक्य नसल्यामुळे गणेशोत्सवानंतरच बांधकामांवर कारवाई सुरू होणार आहे. परंतु त्यापुर्वी या बांधकामांचे वीज, पाणी पुरवठा तोडण्यात येणार आहे. वीज पुरवठा तोडण्यासाठी टोरंट आणि महावितरण कंपनीला पत्र देणार आहोत. तसेच पाणी पुरवठा तोडण्याचे आणि नोटीसा बजावण्याची प्रक्रीया पुर्ण करण्याच्या सुचना प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली. या वृत्तास ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दुजोरा दिला आहे.