ठाणे : ठाणे महापालिकेचे अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. २५ लाख रुपयांची लाच घेताना पथकाने पाटोळे आणि त्यांच्या सहकाऱ्याला अटक केली. खेळण्यातील नोटांचा वापर करुन एसीबीच्या पथकाने पाटोळे यांच्यावर कारवाई केली. विशेष म्हणजे, पाटोळे यांनी बांधकाम व्यवसायिकाकडून ५० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील २५ लाख रुपयांचा हप्ता घेताना ही अटक करण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेत शंकर पाटोळे हे अतिक्रमण नियंत्रण विभागात उपायुक्त पदावर कार्यरत आहेत. बुधवारी ठाणे महापालिकेचा ४३ वा वर्धापनदिन साजरा केला जात होता. त्यामुळे महापालिकेच्या पाचपाखाडी येथील मुख्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पाटोळे हे देखील बुधवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या दालनात असताना अचानक मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक त्यांच्या दालनाबाहेर पोहचले. अवघ्या काही मिनीटांत हे वाऱ्यासारखे पसरल्यानंतर पाटोळे यांच्या दालनाबाहेर पत्रकारांचा, महापालिका कर्मचाऱ्यांचा, ठाण्यातील काही नागरिकांचा गराडा पाहायला मिळाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बंद दाराआड पाटोळे यांची चौकशी केली. पाच तास त्यांची चौकशी केल्यानंतर पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
अतिक्रमण हटविण्यासाठी लाच
– मुंबईतील बांधकाम व्यवसायिकाला नौपाडा येथील विष्णुनगर परिसरातील एका जागेवर विकास करायचा होता. त्या जागेवर तीन अनधिकृत दुकाने होती. ही दुकाने हटविण्यासाठी जागा मालकाने वारंवार प्रयत्न केले. परंतु अतिक्रमण हटविले जात नव्हते. जागा मालक वृद्ध झाल्याने त्याने जागेवरील अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी बांधकाम व्यवसायिकाला दिली होती. व्यवसायिकाने देखील महापालिकेकडे पाठपुरावा केला. परंतु कारवाई झाली नाही.
५० लाखांचा मोह आणि थेट कोठडीत रवानगी
– दरम्यान व्यावसायिकाने त्याच्या काही मित्रांच्या मदतीने पाटोळे यांची भेट घेतली. पाटोळे यांनी हे अतिक्रमण हटविण्यासाठी ५० लाख रुपयांचा आकडा एका चिठ्ठीवर व्यवसायिकाला लिहून दिला. यातील २५ लाख कारवाईपूर्वी आणि २५ लाख कारवाईनंतर देण्याचे ठरविले होते. बांधकाम व्यवसायिकाला लाच द्यायची नसल्याने त्याने थेट मुंबई एसीबी कार्यालय गाठले. तिथे तक्रार दाखल केली.
खेळण्याच्या नोटा वापरुन सापळा
– मुंबई एसीबीने आता सापळा रचण्यासाठी १० लाख रुपये तर उर्वरित १५ लाख रुपयांच्या बनावट नोटा वापरल्या. नोटांच्या पिशवीवर अँथ्राॅसिन पावडर लावण्यात आली होती. कर्मचारी साध्या वेशामध्ये तक्रारदार सोबत महापालिकेत निघाले. त्यावेळी पाटोळे यांनी तक्रारदार यांना संपर्क साधून एकटेच भेटण्यास सांगितले. तसेच रक्कम वाहनातच ठेवण्याची सूचना केली. तक्रारदार हे पाटोळे यांना भेटले. काहीवेळ चर्चा झाल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या वाहनाजवळ आले असता, एक व्यक्ती त्यांच्या मागोमाग आला. तो व्यक्ती तक्रारदार यांच्या वाहनात बसला. त्याने लाचेची रक्कम असलेली पिशवी हातात घेतली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याचे नाव विचारले असता, त्याने त्याचे नाव ओमकार गायकर असल्याचे सांगितले. तसेच तो महापालिकेत आॅपरेटर म्हणून काम करत होता. त्याने ही रक्कम शंकर पाटोळे यांच्या सांगण्यावरुन स्विकारल्याचे कबूल केले. त्यानंतर पथकाने पाटोळे यांची चौकशी करुन त्यांना अटक केली.