ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील ८१ अनधिकृत शाळांमधील १९ हजार ७०८ विद्यार्थ्यांचे इतर अधिकृत खासगी शाळांमध्ये समायोजन करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू असतानाच, त्यापाठोपाठ या शाळांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षात नवे प्रवेश पालकांनी घेऊ नयेत, यासाठी पालिकेने पाऊले उचलली आहेत. या शाळांची यादी पालिका प्रशासनाने पुन्हा जाहीर करत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्याचबरोबर या अनधिकृत शाळा तात्काळ बंद कराव्यात, अशी सुचनाही पालिकेने केली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात अनिधकृतपणे शाळा सुरू असल्याची बाब काही वर्षांपुर्वी पुढे आली होती. या शाळांना महापालिकेकडून सातत्याने नोटीसा बजावण्यात येत आहेत. तरीही संस्था चालक शाळा सुरूच ठेवत असल्याने पालिका प्रशासनावर टिका होत होती. या टिकेनेंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिृकत शाळांच्या स्थितीचा नुकताच आढावा घेऊन शहरातील अनधिकृत शाळांवर कारवाईचे आदेश दिले होते. यानंतर अनधिकृत शाळांविरोधात प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
८१ अनधिकृत शाळांपैकी ६८ शाळांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तर, १३ शाळांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे. अनधिकृत शाळांच्या बांधकामावर अतिक्रमण विभागाकडूनही कार्यवाही प्रस्तावित करण्यात येत आहे. पाणी पुरवठा विभागामार्फत अशा शाळांची नळ जोडणी खंडित करण्यात येत असून आतापर्यंत ३२ अनधिकृत शाळांची नळ जोडणी पालिकेने खंडित केली आहे. याशिवाय, या शाळांना ५२ कोटी रुपयांचा दंडही करण्यात आला आहे. असे असले तरी शाळेंच्या इमारतींवर कारवाई सुरू झालेली नाही. यामुळे यामध्ये पुन्हा शाळा भरविल्या जाऊ शकतात आणि पाल्यांची शैक्षणिक फसवणूक केली जाऊ शकते. हीच बाब लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने या शाळांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षात नवे प्रवेश पालकांनी घेऊ नयेत, यासाठी पालिकेने पाऊले उचलली आहेत. त्यासाठी या शाळांची यादी पालिका प्रशासनाने पुन्हा जाहीर करत त्यात प्रवेश घेऊ नका, असे आवाहन केले आहे. या वृत्तास ठाणे महापालिका शिक्षण विभागाचे उपायुक्त सचिन सांगळे यांनी दुजोरा दिला आहे. तसेच पाल्यांची शैक्षणिक फसवणुक होऊ नये म्हणून पालकसभा घेण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अनधिकृत शाळा
प्रभाग – शाळा संख्या – विद्यार्थी संख्या
दिवा – ६५ – १६४३७
मुंब्रा – ८ – १८२६
माजिवडा-मानपाडा – ३ – ५६२
कळवा – ३ – ४१५
उथळसर – २ – ४६८
एकूण – ८१ – १९७०८