ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते आणि पदपथांवर दिवसा फेरिवाले ठाण मांडून बसत असतानाच, आता काही भागात मध्यरात्रीपर्यंत फेरिवाले बसू लागले आहेत. ठाण्याच्या लोकउपवन आणि वसंत विहार परिसरात मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या खाद्यपदार्थ विक्री होत असून यामुळे रात्रभर येथे होणारी गर्दी, गोंधळ आणि गॅस शेगड्यांचा धोकादायक वापर यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. या संदर्भात सुमारे ५०० नागरिकांनी सह्यानिशी तक्रार करताच, भाजपचे आमदार संजय केळकर यांनी पालिका प्रशासनासोबत चर्चा करून तात्काळ कारवाईच्या सुचना दिल्या. त्यामुळे फेरिवाल्यांविरोधात केळकर मैदानात उतरल्याचे चित्र आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून फेरिवाल्यांचा त्रास वाढू लागला आहे. शहरातील गर्दीच्या परिसरातील पदपथ आणि रस्ते फेरिवाले अडवित असल्यामुळे नागरिकांना चालणे शक्य होत नाही. शहरात फेरिवाला धोरणाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. यामुळेच फेरिवाल्यांकडून रस्ते आणि पदपथांवर अतिक्रमण होताना दिसून येत असून त्यावर फारशी कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून नाराजीचा सुर उमटत आहे. असे असतानाच, आता शहराच्या काही भागात रात्रीच्या वेळेत फेरिवाले ठाण मांडू लागल्याचे चित्र असून अशाचप्रकारची तक्रार ठाण्याच्या लोकउपवन आणि वसंत विहार परिसरातील नागरिकांनी आमदार संजय केळकर यांच्या जनसंवाद कार्यक्रमात केली.
नागरिकांची तक्रार
ठाणे महापालिका हद्दीत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नसल्याने असंख्य फेरीवाले बेकायदेशीरपणे जागा मिळेल तिथे दिवस-रात्र ठाण मांडून बसत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ते आणि पदपथ वापरता येत नाहीत. लोक उपवन आणि वसंत विहार भागात मध्यरात्रीपर्यंत खाद्यपदार्थ तयार करून विकणारे फेरीवाले बेकायदेशीरपणे तळ ठोकून असतात. गॅस शेगड्या यांचा धोकादायक पद्धतीने वापर होत असून येथे मध्यरात्री समाजकंटकांचाही वावर असतो, त्यामुळे या परिसरातील गृहसंकुलांमधील रहिवाशांना या रस्त्यांवरून चालणे मुश्किल झाले असून घराबाहेर पडणेही अशक्य झाले आहे, अशी तक्रार येथील ५०० कुटुंबांनी सह्यानिशी आमदार केळकर यांच्याकडे केली.
तातडीने कारवाई करण्याची सुचना
लोक उपवन आणि वसंत विहार या भागात मध्यरात्रीपर्यंत खाद्यपदार्थांची विक्री केली जात असल्याने येथे होणारी वर्दळ आणि गजबजाटाने रहिवासी त्रस्त झाले आहेत. याबाबत सुमारे ५०० कुटुंबांनी सह्यानिशी तक्रार केल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच या फेरीवाल्यांवर तातडीने ठोस कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी केली. बांगलादेशी नागरिक पुन्हा नारळपाणी विक्रीचा व्यवसाय करू लागले आहेत. यांच्यावरही कारवाई करावी. ठाण्यात फेरीवाला धोरण तातडीने राबविल्यास बेकायदेशीर फेरीवाल्यांचा प्रश्नही संपेल, असे मत केळकर यांनी व्यक्त केले.
