प्रकल्पासाठी ७५० कोटी १३ लाखांचा खर्च अपेक्षित
ठाणे : दिवा येथील बेतवडे परिसरात पंतप्रधान आवास योजनेतून परवडणारी घरे उभारणीसाठी पालिका प्रशासनाने चार निविदा काढूनही त्यास ठेकेदारांनी प्रतिसाद दिला नव्हता. यामुळे पालिकेने खासगी लोकसहभाग (पीपीपी) तत्वावरील प्रस्ताव गुंडाळत अभियांत्रिकी, खरेदी, बांधकाम (ईपीसी) तत्वावर घरांची निर्मीती करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी एकूण ७५० कोटी १३ लाखांचा खर्च अपेक्षित असून हा खर्च लाभार्थीकडून घेऊन ठेकेदाराला देण्यात येणार आहे. तसेच केंद्र आणि राज्य शासनाकडून येणारे अनुदानही ठेकेदाराला देण्यात येणार आहे.
दिवा येथील बेतवडे परिसरातील दोन भुखंडावर पंतप्रधान आवास योजनेतून परवडणाऱ्या घरांची उभारणी करण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने काही वर्षांपुर्वी घेतला होता. हा प्रकल्प खासगी लोकसहभाग (पीपीपी) या तत्वावर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार, आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी १ हजार ४४४१ घरांची उभारणी केली जाणार आहे. त्यापैकी १ हजार २५३ लाभार्थ्यांना परवडणारी घरे अल्पदरात उपलब्ध होणार आहेत. तर, उर्वरित १८८ प्रकल्पबाधितांक़डून सदनिकेसाठी दोन लाख रुपये घेतले जाणार आहेत.
या सदनिका ३० चौरस मीटर चटई क्षेत्राच्या असणार आहेत. या प्रकल्पाच्या कामासाठी पालिका प्रशासनाने सल्लागार कंपनीची नेमणुक करून सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला होता. या आराखड्यानुसार पालिका प्रशासनाने निविदा काढली होती. परंतु त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने पालिका प्रशासनाने आता निविदेतील अटी व शर्तींमध्ये बदल करत नव्याने पुन्हा निविदा काढली होती.
एकूण चार वेळा निविदा काढूनही त्यास प्रतिसाद मिळला नाही. यामुळे हा प्रस्ताव आता गुंडाळत अभियांत्रिकी, खरेदी, बांधकाम (ईपीसी) तत्वावर घरांची निर्मीती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या प्रकल्पासाठी ७५० कोटी १३ लाखांचा खर्च अपेक्षित असून हा खर्च लाभार्थीकडून घेऊन ठेकेदाराला देण्यात येणार आहे. तसेच केंद्र आणि राज्य शासनाकडून येणारे अनुदानही ठेकेदाराला देण्यात येणार आहे.
नव्या प्रस्तावानुसार, बेतवडे येथील सर्व्हे क्र. ७८ या भुखंडावर परवडणारी घरे उभारण्यात येणार असून यात २४८० सदनिकांची निर्मीती करण्यात येणार आहे. या कामासाठी ५९४ कोटी ५१ लाख रुपये इतका खर्च येणार आहे. तर, बेतवडे येथील सर्व्हे क्र. १५/१ या भुखंडावर परवडणारी घरे उभारण्यात येणार असून यात ६०४ सदनिकांची निर्मीती करण्यात येणार आहे. या कामासाठी १५५ कोटी ६२ लाख रुपये इतका खर्च येणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण ७५० कोटी १३ लाखांचा खर्च अपेक्षित असून हा खर्च लाभार्थीकडून घेऊन ठेकेदाराला देण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजना २.० च्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रतिवर्ष वार्षिक उत्पन्न ६ लाख आणि भारतात कुठेही पक्के घर नाही, अशा ३०८४ आर्थिक दुर्बल घटकातील पात्र नागरिकांसाठी पालिका परवडणारी घरे निर्माण करणार आहे. या नागरिकांना बेतवडे सर्व्हे क्र. १५/१ वर २५ लाख ७६ हजार तर, बेतवडे सर्व्हे क्र. ७८ वर २३ लाख ९६ हजार इतक्या रक्कमेची सदनिका उपलब्ध होणार आहे. या नागरिकांना राज्य शासनातर्फे एक लाख तर, केंद्र शासनातर्फे दिड लाख या प्रमाणे अडीच लाख रुपये अनुदान प्राप्त होणार आहे.
ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थी निश्चित केले जाणार आहेत. त्यानंतर अंतिम यादी तयार करुन पुढील प्रक्रिया राबविली जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव नुकत्याच झालेल्या प्रशासकीय महासभेत मंजुरी देण्यात आली असून हा हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.