महापालिका ‘स्नो वर्ल्ड पार्क’ साकारणार; सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणेकरांना मनोरंजनाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी शहरामध्ये सेंट्रल पार्क, कम्युनिटी पार्क, चिल्ड्रन आणि ट्रॅफिक पार्क, थिम पार्क आणि अन्य उद्याने उभारण्यात येत असतानाच आता त्यापाठोपाठ आता स्नो वर्ल्ड पार्कही उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या संदर्भात प्रशासनाने तयार केलेल्या सविस्तर प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. त्यामुळे शहरामध्ये हे पार्क उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्कच्या माध्यमातून ठाणेकरांना बर्फाशी संबंधित सर्व प्रकारच्या मनोरंजक सुविधा आणि खेळ तसेच बर्फाच्छादीत क्षेत्राचे विज्ञानाच्या माध्यमातून ज्ञान मिळणार आहे. याशिवाय, विविध कार्यक्रम आणि प्रदर्शनांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. कोलशेत येथील आरक्षित जागेत हे स्नो वर्ल्ड पार्क उभारण्यात येणार आहे.

ठाणे शहरामध्ये गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले असून शहरातील नागरिकांसाठी पुरेशी मनोरंजनासाठी साधने मात्र उपलब्ध नाहीत. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गेल्या दोन वर्षांपासून शहरात विविध प्रकारची उद्याने उभारण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये सेंट्रल पार्क, कम्युनिटी पार्क, नंदन पार्क, फाऊंटन पार्क, जिम्नॅस्टिक सेंटर, अर्बन फॉरेस्ट, चिल्ड्रन अँण्ड ट्रॅफिक पार्क, बटरफ्लॉय पार्क, थिम पार्क, जुने ठाणे- नवीन ठाणे, बॉलीवूड पार्क, एंजल्स पॅराडाईज पार्क या उद्यानांचा समावेश आहे. स्नो पार्कसंबंधीचा सविस्तर प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. या प्रस्तावानुसार स्नो वर्ल्ड पार्कचे बांधकाम पर्यावरणस्नेही पद्घतीने करण्यात येणार आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर, उर्जा संवर्धनासाठीचे उपाय, वर्षां जलसंचयन प्रकल्प, खत प्रकल्प, घनकचरा विघटन या सर्वाचा वापर करून हे पार्क उभारण्यात येईल.

असे असेल पार्क..

स्नो पार्कमध्ये खेळासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात येणार आहे. हिमालयामध्ये ज्याप्रमाणे बर्फवृष्टी होते, त्याप्रमाणे उद्यानात कृत्रिम बर्फवृष्टीची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. स्लाईड्स, स्नो मेरी-गो-राऊंड, स्नो-माऊंटन क्लाइंबिंग, अलपाइन हिल्स, आईस स्कल्पचर्स, स्नो-डान्सिंग फ्लोअर या सुविधांचाही पार्कमध्ये समावेश आहे. विद्यार्थी व लहान मुले यांना बर्फाळ प्रदेशातील पर्यावरणाचा व राहणीमानाचा मनोरंजनाच्या माध्यमातून अभ्यास करता यावा यासाठीही खास सुविधा देण्यात आल्या आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal corporation to set up snow world park
First published on: 18-10-2017 at 01:57 IST