ठाणे : पर्यावरणपुरक गणेश मूर्ती बनविण्यासाठी जागा, शाडूची माती आणि विक्रीसाठी प्रभागनिहाय जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा ठाणे महापालिका प्रशासनाने गुरुवारी मुर्तीकारांच्या बैठकीत केली. यामुळे पर्यावरणपूरक विसर्जन व्यवस्थेचा ठाणेकरांनी सकारात्मकपणे स्वीकार केल्यानंतर आता पर्यावरणपूरक गणेश मूर्तींच्या निर्मिताला प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेने पाऊले उचलल्याचे चित्र आहे.

पर्यावरणपूरक सण आणि उत्सव साजरे करण्याबाबत उच्च न्यायालय, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. या पार्श्वभूमीवर, मूर्तीकारांशी चर्चा करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने गुरूवारी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत, ठाणे महापालिका क्षेत्रातील मूर्तीकार संघटना, गणेशोत्सव समन्वय समिती, स्वयंसेवी संस्था यांच्याशी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे यांनी संवाद साधला. यावेळी उपायुक्त डॉ. पद्मश्री बैनाडे, शंकर पाटोळे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, विधि अधिकारी मकरंद काळे उपस्थित होते.

हेही वाचा >>>उल्हासनगरच्या आयुक्तपदी मनीषा आव्हाळे

मूर्तीकार संघटनेतर्फे विजय बोळींजकर यांनी हळूहळू शाडूच्या मूर्तींचा प्रसार होत राहील, असे सांगत याविषयी न्यायालयात मूर्तीकारांची बाजू मांडत असल्याचीही माहिती दिली. ठाणे गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष समीर सावंत, मुर्तीकार शुभम चिखले, मंगेश पंडित, साक्षी गांधी, नागोठणेकर यांनी मूर्तीकारांसमोर असलेले प्रश्न या बैठकीत मांडले. बाहेरून येणाऱ्या मूर्ती, उत्सवापूर्वी सर्वत्र लागणारे मूर्ती विक्रीचे स्टॉल्स, पीओपी मुर्तीला असलेली भाविकांची पसंती असे मुद्दे त्यांनी मांडले. शाडूच्या मूर्ती बनविण्यास लागणारा वेळ, त्याची घ्यावी लागणारी काळजी असे विषय उपस्थित करत पीओपीला शाडूचा पर्याय योग्य नसून त्यासाठी दुसरा पर्याय शोधून देण्याची मागणी काही मुर्तीकारांनी केली. तर काही मुर्तीकारांनी शाडू मातीच्या मुर्तीही मजबुत असतात, असे काही मुर्तीकारांनी सांगितले. तसेच, शाडूच्या मूर्तींची उपलब्धता, त्यात होत असलेले प्रयोग, मूर्तींसाठी भाविकांकडून स्वीकारले जाणारे इतर पर्याय यांचीही सकारात्मक चर्चा या बैठकीत झाली.

हेही वाचा >>>कुमार आयलानी यांना पुत्रशोक; धीरज आयलानी यांचे निधन, उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

जनहित याचिकाकर्ते रोहित जोशी यांनी कायद्याची लढाई सुरूच राहील, पण आपण सगळ्यांनी समंजसपणे वागून पुढील पिढ्यांचा विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे. ठाणे खाडी क्षेत्र हे रामसार क्षेत्र जाहीर झाले असल्याने आपली जबाबदारी वाढली आहे, असे मत मांडले. महापालिकेने मूर्ती विक्रीसाठी परवाना घेणे बंधनकारक करावे. मूर्ती विक्रीचा किती वर्षांचा व्यवसाय आहे हेही पहावे, असा आग्रह या बैठकीत धरण्यात आला. मॉलमध्ये विक्रीसाठी काऊंटर, विक्रीच्या स्थानांची प्रसिद्धी करण्यात येईल, असे या बैठकीत महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले.

गेल्या वर्षी गणेशोत्सवात आणलेल्या मूर्तींपैकी ३० टक्के मूर्ती या शाडूच्या मातीपासून बनवलेल्या होत्या. महापालिकेने पर्यावरणपूरक उत्सवासाठी प्रदर्शन आयोजित केले होते. तसेच, शाडूची माती व जागाही उपलब्ध करून दिली होती. त्याचबरोबर, पर्यायी विसर्जन व्यवस्थाही केली होती, अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी बैठकीत दिली.

मूर्ती बनविण्यासाठी जागा, शाडूची माती, विक्रीसाठी प्रभागनिहाय जागा महापालिकेमार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे. २००५ पासून कृत्रिम तलावांची विसर्जन व्यवस्था उभी करून सगळ्यांसाठी ठाणे शहराने आदर्श घालून दिला आहे. त्याच धर्तीवर पीओपीऐवजी शाडूच्या मूर्ती करण्यातही ठाण्यातील मूर्तीकारांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य महापालिका करेल.-संदीप माळवी,अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मूर्तींचे विसर्जन व्यवस्थित व्हावे. त्यात त्यांना काही इजा पोहोचू नये, यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. हा वैयक्तिक विषय नसून जनहिताचा आहे. त्याचा आपण मान राखायला हवा. मूर्तीकारांचे कोणतेही नुकसान होऊ नये, अशी प्रशासनाची भूमिका आहे. त्यामुळेच उत्सवाच्या खूप आधीच, जानेवारी महिन्यात बैठक घेण्यात आली आहे.-प्रशांत रोडे, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका