ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी यासाठी रुग्णालयाच्या नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. राज्य शासनाने दिलेल्या ६० कोटींच्या निधीमधून हे काम केले जाणार असून या कामाचा कार्यादेश ठेकेदाराला देण्यात आल्याने लवकरच कामाला सुरूवात होणार आहे. एकाच वेळी नुतनीकरणाचे काम करणे शक्य नसल्यामुळे पालिका टप्प्याटप्प्याने नुतनीकरणाचे काम करणार आहे.

ठाणे महापालिकेचे कळवा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. या रुग्णालयात ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेकडो गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. हे रुग्णालय पाचशे खाटांचे आहे. रुग्ण संख्येच्या तुलनेत हे रुग्णालय अपुरे पडू लागले आहे. रुग्ण उपचारासाठी खाटा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना इतरत्र उपचारासाठी जावे लागत आहेत. त्याचबरोबर रुग्णालय इमारतीची दुरावस्था झाली असून काही ठिकाणी पाण्याची गळती होत आहे. त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. नेमकी हि बाब लक्षात घेऊन रुग्णालयाच्या नुतनीकरणाचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला होता. या कामासाठी राज्य शासनाने काही महिन्यांपुर्वी ६० कोटींचा निधी मंजूर केला होता. राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होताच, ठाणे महापालिका प्रशासनाने निविदा प्रक्रीयेला सुरूवात केली होती. डिसेंबर महिन्यातच निविदा प्रकिया उरकून कामाला सुरवात केली जाणार होती. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे ही प्रक्रीया उरकण्यास काहीसा विलंब झाला असून आता ही प्रक्रीया उरकून पालिकेने कामाचा कार्यादेश ठेकेदाराला दिला आहे. यामुळे रुग्णालय नुतनीकरण कामाला लवकरच सुरूवात होणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांकडून देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तळ अधिक एक मजल्याचे होणार नुतनीकरण

रुग्णालयातील तळ अधिक एक मजल्यावरील अंतर्गत बांधकामांची दुरुस्ती केली जाणार आहे. रुग्णालयातील काही विभागांमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असते. तरिही तिथे रुग्ण कक्ष मोठे आहेत. तर, काही विभागांमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असते. तिथे रुग्ण कक्ष छोटे आहेत. त्यामुळे रुग्णालयातील सर्वच कक्षांचा आढावा घेऊन रुग्ण संख्येनुसार कक्षांची जागा निश्चित करण्यात येणार आहे. बांधकामाबरोबरच रंगरंगोटी आणि इतर आवश्यक कामे केली जाणार आहेत. याशिवाय, रुग्णालयात अत्याधुनिक उपचार यंत्रे खरेदी करण्यात येणार आहेत. रुग्णालयात काही ठिकाणी वातानुकूलीत यंत्रणा नाही. याठिकाणी वातानुकूलीत यंत्रणा बसविण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयाच्या धर्तीवर कळवा रुग्णालयाचा कारभार संगणक प्रणालीद्वारे करण्यासाठी यंत्रणा खरेदी करण्यात येणार आहे. या कामामुळे ठाणेकरांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्याची चिन्हे आहेत. नुतनीकरण काळात रुग्णालयात रुग्ण उपचाराची सुविधा सुरू राहणार असल्यामुळे एकाच वेळी नुतनीकरण करणे शक्य होणार नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने नुतनीकरणाची कामे केली जाणार आहेत, असे पालिका सुत्रांनी सांगितले.