ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातून जाणारे आणि राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणांच्या अख्यारित असलेल्या महामार्गांसह त्यावरील उड्डाणपुलांवर पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांची भीती व्यक्त होत असून हे खड्डे संबंधित यंत्रणेकडून बुजविण्यात आले नाहीतर, पालिकेमार्फत बुजविण्यात येणार आहेत. यामुळेच या मार्गांवरील खड्डे भरणीची कामे करण्यासाठी ठाणे पालिका पुन्हा सरसावल्याचे चित्र आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातून मुंबई-नाशिक महामार्ग तसेच घोडबंदर मार्ग जातो. हे दोन्ही मार्ग शहरातील अंतर्गत मार्गांना जोडण्यात आलेले आहेत. घोडबंदर मार्गावरील उड्डाणपुल सार्वजनिक बांधकाम विभाग तर, पुलाखालील रस्ता मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या अखत्यारित येतो. या मार्गांवर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडून वाहतूक कोंडी होण्याबरोबरच अपघात होतात. यंदाही गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या मार्गांवर खड्डे पडले आहेत. या मार्गांच्या दुरुस्तीचे काम संबंधित यंत्रणांनी हाती घेतले होते. मात्र मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्याने मार्गांच्या दुरुस्तीचे काम रखडले. त्यातच पावसामुळे रस्त्यांवर खड्डेही पडले आहेत.
खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साठते आणि त्यामुळे वाहनचालकास ते दिसून येत नाही. हे चित्र पातलीपाडा, वाघबीळ, माजिवडा या पुलांवर दिसून येते. या पुलांवरील खड्ड्यात रिक्षा किंवा स्कुटरचे चाक अडकून अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. याशिवाय, कार आणि अवजड वाहनेही खड्ड्यात आदळत असून अवजड वाहने उलटून अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून संबंधित प्राधिकरणांवर टिका होऊ लागली असली तरी याठिकाणी खड्डे भरणीची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. त्यामुळे या यंत्रणांनी खड्डे भरणी केली नाहीतर, पालिकेमार्फत मास्टीकद्वारे खड्डे भरणी करण्याचे आदेश ठाणे महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि खड्ड्यांमुळे अपघात होऊ नये यासाठी त्यांनी हे आदेश दिले आहेत. या संदर्भात नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला.
रस्ते प्राधिकरणांचे पण, टिका पालिकेवर
ठाणे महापालिका क्षेत्रातून जाणारे महामार्ग हे राज्य शासनाच्या विविध विभागांच्या अखत्यारीत येतात. या रस्त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी संबंधित प्राधिकरणांची असते. परंतु गेल्या अनेक वर्षांंपासून पावसाळ्याच्या कालावधीत रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याच्या कामाची जबाबदारी संबंधित यंत्रणा पुर्णपणे पार पडताना दिसून येत नाही. हे रस्ते केवळ पालिका क्षेत्रातून जात असल्याने त्यावरून पालिकेवर टिका होते. यामुळे पालिका गेल्या काही वर्षांपासून प्राधिकरणांच्या रस्त्यांवरील खड्डे भरणीची कामे करत असून त्याचा निधीही पालिकेला संबंधित प्राधिकरणाकडून मिळत नसल्याचे चित्र यापुर्वीच समोर आले आहे.
मुंबई आणि ठाणे शहरांच्या प्रवेशद्वारावरील आनंदनगर येथील रस्त्यावर पडलेले खड्डे बुधवारी बुजविण्यात आले. खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने त्यांची यंत्रणा लावली होती. तर, खड्डे भरणीसाठी लागणारे साहित्य मात्र एमएमआरडीएने उपलब्ध करून दिले होते, अशी माहिती सुत्रांनी दिली.