ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळेच्या २६ इमारती धोकादायक झाल्याने त्यांची दुरुस्ती करण्याचे काम पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने एप्रिल महिन्यात हाती घेतले. मात्र, यातील काही शाळांची कामे पुर्ण झालेली नसतानाच त्याठिकाणी शाळेचे वर्ग भरण्यास सुरूवात झाली असून यामुळे दुरुस्ती काम करणे शक्य होत नसल्याने आता सुट्टीच्या दिवसांमध्ये ही कामे करण्याचे नियोजन प्रशासनाने आखले आहे.
पावसाळ्यात धोकादायक इमारत कोसळून दुर्घटना घडू नये यासाठी ठाणे महापालिका दरवर्षी पावसाळ्यापुर्वी शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते. याशिवाय, पालिकेच्या मालकीच्या इमारतींचीही तपासणी करते. यात धोकादायक इमारतींचे सी-१, सी-२ ए, सी-२बी आणि सी-३ अशा चार टप्प्यांत वर्गीकरण करण्यात येते. सी-१ म्हणजे राहण्यास अयोग्य आणि तात्काळ निष्कासित करावी लागणारी अतिधोकादायक इमारत, सी-२ ए म्हणजे इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे, सी-२ बी म्हणजे इमारत रिकामी न करता त्याची संरचनात्मक दुरुस्ती करणे आणि सी-३ म्हणजे इमारतींची किरकोळ दुरुस्ती करणे. याप्रमाणे पालिकेने काही दिवसांपुर्वी शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली. त्याचबरोबर काही महिन्यांपुर्वी पालिका शाळेच्या इमारतीच्या बांधकामांचे संरचनात्मक परिक्षण करून घेतले. त्यात २६ इमारती धोकादायक असल्याचे समोर आले होते. त्यातील दोन इमारती सी-२ ए वर्गवारीतील तर, २४ इमारती सी-२ बी वर्गवारीत होत्या.
या इमारतींच्या दुरुस्तीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता आणि त्यासाठी ५० कोटींचा निधी राज्य शासनाने दिला होता. जानेवारी कामाचे कार्यादेश ठेकेदारांना देण्यात आले होते. मात्र, या शाळा सुरू असल्याने दुरुस्तीची कामे एप्रिल अखेर पासून सुरु झाली असून ही कामे एका वर्षात पुर्ण करण्याची मुदत आहे. यातील दोन इमारतीमधील शाळा दुरुस्ती कामासाठी इतरत्र इमारतीत भरविण्यात येत आहेत. तसेच जून महिन्यात शाळा सुरू झाल्याने २४ इमारतीच्या दुरुस्तीचे काम करणे शक्य होत नसल्याने पालिकेने आता सुट्ट्यांच्या दिवशी म्हणजेच शनिवार, रविवार, उत्सवाच्या मोठ्या सुट्ट्यांच्या काळात ही कामे उरकण्याचे नियोजन आखले आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
ठाणे महापालिकेच्या प्राथमिक १०३ आणि माध्यमिक २३ अशा एकूण १२६ शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे ३५ हजारांच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील २६ शाळांमध्ये रंगकाम, प्लास्टर करणे, खिडकी, दरवाजा दुरुस्ती, शौचालयांची दुरुस्ती, वर्ग खोल्यांची दुरुस्ती अशी कामे केली जाणार आहेत.