ठाणे : ठाणे खाडीतील पाणी प्रदुषित होऊ नये आणि तेथील जैवविविधतेला धोका निर्माण होऊ नये या उद्देशातून ठाणे शहरातील नाल्यांमधून वाहणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया ते खाडीत सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार, शहरातील २४ नाल्यातील पाणी वळवून मलप्रक्रिया केंद्रात आणून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी ७० कोटी ५३ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाच्या प्रस्तावास पालिकेच्या प्रशासकीय सभेने नुकतीच मान्यता दिल्याने प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठाणे महापालिकेच्या मलनिःस्सारण विभागाने तांत्रिक सल्लागार म्हणून मे. वॉटरनेट कन्सल्टींग सर्व्हिसेस प्रा. लि. यांची नेमणूक केली होती. त्यांनी ठाण्यातील सांडपाण्याचे सर्वेक्षण करून त्यातील पाण्याची गुणवत्ता तपासली. त्यात बीओडी = ३५ मिग्रॅ/लिटर, सीओडी = ११७ मिग्रॅ/लिटर, टीएसएस = ८५ मिग्रॅ/लिटर आढळून आळे होते. यामुळे नाल्यातील पाणी प्रक्रीया करूनच खाडीत सोडण्याचा सल्ला सल्लागार कंपनीने दिला होता. त्यानुसार, नाल्यातील सांडपाणी मलवाहिनीत वळवून ते अस्तित्वातील किंवा प्रस्तावित मलप्रक्रिया केंद्रांमध्ये प्रक्रिया करण्यात येणार आहे. यानुसार, एकूण २४ पैकी १७ ठिकाणी नाल्यातील पाणी अडवून ते उतारानुसार मलवाहिनीस जोडण्यात येणार आहे. ५ ठिकाणी मलउदंचन केंद्रे उभारली जाणार आहेत. तर, उर्वरित २ ठिकाणी जागेवरच मलप्रक्रिया केंद्र उभारली जाणार आहेत.

या प्रकल्पानुसार पावसाळ्याचा कालावधी वगळून इतर वेळेत सुमारे १२७.१३ दशलक्ष लीटर सांडपाणी नाल्यांमधून वाहत असून, यापैकी पहिल्या टप्प्यात सुमारे ६५.१६ दशलक्ष लीटर पाणी शुद्धीकरणासाठी मलप्रक्रिया केंद्रांमध्ये नेले जाणार आहे. प्रक्रिया केलेले पाणी खाडीत सोडल्याने खाडीतील जैवविविधता सुधारेल, तसेच जागेवरील केंद्रांमधून शुद्ध झालेले पाणी उद्यानासाठी वापरता येईल. तसेच सुमारे २ दशलक्ष लीटर पिण्यायोग्य पाणी नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध होईल, असा दावा प्रस्तावात करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ७० कोटी ५३ लाख रुपये असून, तो अमृत २.० योजनेअंतर्गत राबविला जाणार आहे. यात केंद्र आणि राज्य शासनाचा प्रत्येकी २५ टक्के तर, उर्वरित ५० टक्के खर्च ठाणे महापालिका करणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी सुमारे १८ महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता असून, अनुदानासाठी हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल. प्रकल्पाच्या देखरेखीसाठी स्वतंत्र प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमला जाणार आहे, असे पालिकेने म्हटले आहे.