भाईंदर : ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी सोमवारी मिरा रोड आणि भाईंदर रेल्वे स्थानकांची पाहणी केली. यावेळी स्थानकांवरील प्रलंबित कामांची माहिती घेत,त्यांनी अधिकाऱ्यांना कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
पश्चिम रेल्वे मार्गावरील भाईंदर आणि मिरा रोड ही प्रमुख रेल्वे स्थानके असून, या ठिकाणांहून लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. त्यामुळे या स्थानकांवर आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, या सुविधा तसेच स्थानकांच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या समस्या दूर करण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे स्थानकांची पाहणी केली. त्यांनी प्रामुख्याने स्थानकांवरील स्वच्छतागृहे, एक्सलेटर, छतावरील कामे तसेच वाहनतळाच्या समस्यांचा आढावा घेतला. यावेळी नव्याने प्रस्तावित असलेल्या कामांना गती देण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या सूचना :भाईंदर आणि मिरा रोड रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेच्या बाबतीत खासदार नरेश म्हस्के यांनी गंभीर दखल घेतली. महिला प्रवाशांना होणारा त्रास, तसेच तृतीयपंथीय आणि वेश्याव्यवसायामुळे निर्माण होणाऱ्या समस्या त्यांनी प्रवाशांकडून जाणून घेतल्या. या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस आणि शहर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्याशी समन्वय साधून तातडीने उपाययोजना राबवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.