ठाणे : अनुंवशिक रक्तविकार असलेल्या थॅलेसेमिया या आजाराबाबत नागरिकांना जागृत करणे, त्यावरील निदान, रूग्णव्यवस्था यासंदर्भात माहिती देण्यासाठी ठाण्यात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कै. वामनराव ओक रक्त केंद्र, ठाणे यांच्या वतीने या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून ही कार्यशाळा रविवार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत ठाणे पश्चिमेतील नौपाडा येथील हितवर्धिनी सभागृहात होणार आहे.
थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक रक्तविकार असून यात रक्तातील हीमोग्लोबिन नीट तयार होत नाही. परिणामी शरीरात ऑक्सिजन पुरविण्याचे कार्य कमी होते आणि रुग्णाला सतत रक्ताल्पता जाणवते. थकवा, अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास अशी या आजाराची लक्षणे दिसून येतात. या आजाराबाबत नागरिकांना माहिती मिळावी यासाठी ठाण्यात विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उदघाटन ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यशाळेत पाच सत्रांद्वारे तज्ज्ञ डॉक्टर्स आणि सामाजिक कार्यकर्ते थॅलेसेमियासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे अनुभवही यामध्ये मांडले जाणार आहेत.
या कार्यक्रमात राज्य समन्वयक डॉ. आशुतोष काळे, पॅथॉलॉजिस्ट डॉ. महेंद्र केंद्रे, आयसीएमआरच्या माजी अध्यक्ष डॉ. स्मिता महाले, अनुवंशशास्त्र तज्ज्ञ डॉ. शैलेश पांडे, बालरोग व कर्करोग तज्ज्ञ डॉ. रत्ना शर्मा, आयसीएमआरचे वरिष्ठ उपसंचालक डॉ. अजित गोरक्षकर, तसेच लाईफ ब्लड कौन्सिलचे संस्थापक विनय शेट्टी आणि लक्ष्मीकांत पिंपळगावकर सहभागी होणार आहेत.
या कार्यशाळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अजित मराठे आणि कै. वामनराव ओक रक्त केंद्र अध्यक्ष किरण वैद्य उपस्थित राहणार आहेत. बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, थॅलेसेमिया रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांबरोबरच सामाजिक कार्यकर्त्यांसाठी ही कार्यशाळा असणार आहे.
कार्यशाळेत कसे सहभागी व्हावे
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून, इच्छुकांनी ९३२६४३४२६३ किंवा ९८२०५२३७५९ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन केंद्राचे सदस्य विद्याधर घांगुर्डे यांनी केले आहे.
थॅलेसेमिया म्हणजे काय ?
थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक रक्तविकार आहे. यात रक्तातील हीमोग्लोबिन नीट तयार होत नसल्याने शरीरात ऑक्सिजन पुरवठा कार्य कमी होते. यामुळे रुग्णाला सतत रक्ताल्पता जाणवते. थकवा, अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसतात. थॅलेसेमियाचे दोन प्रकार असून, कमी प्रमाणात असलेल्या प्रकारात रुग्णाला फारसा त्रास होत नाही. परंतु अशा व्यक्तींच्या विवाहातून जन्मलेल्या मुलांना गंभीर प्रकार म्हणजेच थॅलेसेमिया होऊ शकतो. गंभीर प्रकारात रुग्णाला आयुष्यभर रक्त चढवावे लागते आणि त्याचबरोबर अतिरिक्त लोखंड कमी करण्यासाठी औषधोपचार घ्यावे लागतात. काही प्रकरणांत हाडमज्जा प्रत्यारोपण हा उपचार उपयुक्त ठरतो. या आजारापासून बचाव करण्यासाठी लग्नाआधी वाहक तपासणी करणे अत्यंत आवश्यक मानले जाते.