कल्याण : छत्रपती शिवाजी टर्मिनसहून बदलापूरकडे जाणारी सकाळची ९.३४ ची सामान्य लोकल मागे ठेऊन त्याच्या पाठीमागील ९.३७ सकाळची कल्याण वातानुकूलित लोकल रेल्वे प्रशासनाने पुढ काढल्याने प्रवाशांनी शुक्रवारी सकाळी या दुजाभावा बद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. बदलापूर लोकल त्यामुळे अर्धा तास उशिरा धाऊ लागली, अशी माहिती ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली.

सामान्य आणि वातानुकूलित लोकल असा दुजाभाव करून रेल्वे प्रशासन प्रवाशांमध्ये दुहीची बीजे का पेरते, असे प्रश्न प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केले. छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटलेली बदलापूर लोकल सकाळी १०.१७ वाजता बदलापूर रेल्वे स्थानकात पोहचते. आणि तेथून सकाळी १०.२६ वाजता परतीचा प्रवास सुरू करते. मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण परिसरातील बदलापूर भागात नोकरी, व्यवसायानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांना ही लोकल सोयीची आहे. त्यामुळे ही लोकल वेळेत धावावी अशी प्रवाशांची अपेक्षा असते.

परंतु, अनेक वेळा रेल्वेकडून या लोकल पाठमागची छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण सकाळची ९.३७ लोकल बदलापूर लोकल पाठीमागे उभी ठेऊन पुढे काढली जाते. त्यामुळे बदलापूर लोकलमधील प्रवासी उशीर होतो. याविषयी प्रवासी संतप्त आहे, असे अध्यक्ष देशमुख यांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी असाच प्रकार घडला आहे. वातानुकूलित लोकलमधून विशिष्ट वर्ग प्रवास करतो म्हणून त्यांच्यासाठी ही सोय करण्यात येते का. प्रत्येक लोकल वेळेत रेल्वे स्थानकात पोहचली पाहिजे. धावली पाहिजे. यामध्ये कोणताही दुजाभाव रेल्वे प्रशासनाकडून होता कामा नये, असे उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेचे सरचिटणीस जितेंद्र विशे यांनी सांगितले.

सामान्य लोकल मधून प्रवास करणारे प्रवासी वेगळे आणि वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी विशिष्ट असा भेद करून प्रवाशांमध्ये नाराजी पसरविण्याचे काम रेल्वेकडून करण्यातच येऊ नये, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनांकडून करण्यात आली. असे प्रकार अलीकडे वारंवार घडू लागले आहेत. हे प्रकार रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेऊन थांबवावेत. वेळेत धावत असलेल्या सामान्य, वातानुकूलित लोकल पुढे पाठमागे करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येऊ नये असे प्रवाशांनी सांगितले.

वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या बरोबरच्या बैठकीत सामान्य आणि वातानुकूलित लोकल, श्रीमंत आणि गरीब प्रवासी असा भेदभाव रेल्वे प्रशासनाने करू नये असे आम्ही सांगितले आहे. अलीकडे सामान्य लोकल मागे ठेऊन मेल, वातानुकूलित लोकल पुढे काढण्याचे प्रकार वाढत आहेत. रेल्वेने ही हुकूमशाही बंद करावी. सतत सांगुनही रेल्वेचे दुजाभावाचे प्रकार सुरू आहेत. याविषयी रेल्वे मंत्र्यांकडे तक्रार केली जाणार आहे. नंदकुमार देशमुख अध्यक्ष,ठाणे रेल्वे प्रवासी संस्था.

रेल्वे प्रशासनाने वेळेत लोकल धावत आहेत हे पाहावे. एसी लोकल पुढे, वेळेत धावणारी सामान्य लोकल मागे अशी गणिते करून प्रवाशांमध्ये दुजाभावाची गणिते बीजे पेरू नयेत. त्याचे गंभीर परिणाम होतील. जितेंद्र विशे सरचिटणीस, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ.