ठाणे : वर्तकनगर येथील पोखरण रोड क्रमांक एक येथील वाहतुक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी काही वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेने येथील रस्ता रुंदीकरण केले होते. परंतु या रस्ता रुंदीकरणाचे खरे लाभार्थी येथील श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतील पालक ठरत आहेत. शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर दोन ते तीन वाहिन्या पालक अडवित असून ही वाहने रस्त्यात उभी केली जात आहेत. त्यातच, येथील भाजपचे विभागीय कार्यालय असून येथील बैठकांच्या सत्रांमुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील रस्त्यालगत बिनदिक्कत वाहने उभी करतात. त्यामुळे वर्तकनगरहून पूर्व द्रुतगती महामार्गाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांना विनाकारण मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

गेल्याकाही वर्षांपासून वर्तकनगर, उपवन, कोरस, शिवाईनगर या भागात मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. येथील वाहतुकीसाठी पोखरण रोड क्रमांक एक महत्त्वाचा मार्ग मानला जातो. ठाणे महापालिकेचे तत्त्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या प्रयत्नानंतर सुमारे नऊ वर्षांपूर्वी येथील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून हा रस्ता रुंद करण्यात आला होता. त्यानंतर येथील वाहतुक कोंडी सुटली असा दावा केला जात असला तरी बेकायदेशीर उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेमध्ये पाल्यांना ने-आण करण्यासाठी पालक चार चाकी वाहनांनी येतात. विशेष म्हणजे, मार्गिकेवरील तीन ते चार वाहिन्या या पालकांकडून वाहने उभी करून गिळंकृत केल्या जातात. त्यामुळे केवळ एक किंवा दोन वाहिन्या वाहन चालकांसाठी उपलब्ध होतात. त्याचा परिणाम वाहतुकीवर होतो. या समस्येबाबत अनेक तक्रारी प्राप्त होऊनही वाहतुक पोलिसांकडून या वाहन चालकांवर ठोस कारवाई केली जात नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

भाजपने देखील या भागात विभागीय कार्यालय सुरु केले आहे. शुक्रवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्या आलिशान मोटारी घेऊन ते कार्यालय गाठत होते. परंतु वाहने उभी करण्यासाठी त्यांनी पोखरण रस्ता एकचा वापर केला. त्यामुळे या भागात वाहतुक कोंडीत भर पडत होती. या कोंडीमुळे कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता.

श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेच्या मुख्याध्यापिका रेवती श्रीनिवास यांना संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोखरणरोड क्रमांक एक येथील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहन चालकांविरोधात आम्ही कारवाई करत असतो. – पंकज शिरसाट, उपायुक्त, ठाणे वाहतुक शाखा.