ठाणे : ठाणे शहरात यंदाही मोठ्याप्रमाणात दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले असून यामुळे ठाणे पोलिसांनी शहरातील मुख्य तसेच अंतर्गत मार्गांवर वाहतुक बदल लागू केले आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दहीहंड्यांच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय, साध्या वेशातील पोलिसही दहीहंडींच्या ठिकाणी गस्त घालणार आहेत. गोविंदा पथकांची वाहने शहरात दाखल होऊन कोंडीची शक्यता असल्याने पथकांच्या वाहनांना शहरातील अंतर्गत रस्त्यावर प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पथकांच्या वाहनांना पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या सेवा रस्त्यालगत वाहने उभी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
ठाणे शहरात विविध मंडळे, प्रतिष्ठान, विश्वस्त संस्थांच्या माध्यमातून राजकीय पक्षाचे नेते दहीहंडीचे आयोजन करतात. ठाण्यातील टेंभीनाका येथे टेंभीनाका मित्र मंडळाच्या वतीने शिवसेना (शिंदे गट), चिंतामणी चौकात आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ठाकरे गटाचे नेते राजन विचारे, मनसेच्या वतीने नौपाडा येथील भगवती मैदान, संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रताप सरनाईक यांच्या वतीने वर्तकनगर येथे तर संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने माजी आमदार रविंद्र फाटक यांच्या माध्यमातून रहेजा गार्डन येथे मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. यंदाही या हंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यासह इतर पक्षांचे पदाधिकारी, संस्थांमार्फत देखील शहरातील मुख्य चौक, अंतर्गत रस्ते, गृहसंकुले अशा ठिकाणी दहीहंड्या आयोजित केल्या आहेत. यंदा ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात, म्हणजेच ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात १३०० हून अधिक ठिकाणी दही हंड्यांचे आयोजन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांचाही फौजफाटा ठिकठिकाणी तैनात असेल. यामध्ये सर्व परिमंडळाचे उपायुक्त, १२ सहाय्यक आयुक्त, ९८ पोलीस निरीक्षक, २९७ साहाय्यक पोलीस निरीक्षकांचा सामावेश असेल.
ठाणे शहरात दहीहंडी निमित्ताने ठाणे शहरासह मुंबई शहर, उपनगरे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, रायगड, पालघर या भागातूनही गोविंदा पथके येत असतात. गोविंदा पथके ट्रक, टेम्पो मधून येत असल्याने जड वाहनांचा भार वाढून कोंडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसांनी शहरात वाहतुक बदल लागू केले आहेत.
महत्त्वाचे वाहतुक बदल
– पूर्व द्रुतगती महामार्गावरून कोपरी पूल, तीन हात नाका, धर्मवीरनगर नाका, नितीन कंपनी नाका येथून ठाणे शहरात वाहतुक करणाऱ्या एसटी, बेस्ट आणि खासगी बसगाड्यांना संबंधित भागातून शहरात प्रवेशबंदी केली आहे. तसेच ठाणे स्थानक परिसरातून वाहतुक करणाऱ्या बसगाड्यांना वरील ठिकाणी प्रवेश करण्यास बंदी असेल. बसगाड्या कॅडबरी जंक्शन नाका येथून खोपट, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, कोर्ट नाका, बाजारपेठ येथून वाहतुक करतील.
– गोविंदा पथकांच्या वाहनांना कोपरी पूल नाका, तीन हात नाका, नितीन कंपनी नाका, धर्मवीरनगर नाका, कॅडबरी नाका येथून ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यावर प्रवेश करण्यास बंदी असेल. येथील वाहने महामार्गावरील सेवा रस्त्या लगत उभी करता येतील.
– कळवा, जीपीओ, कोर्टनाका मार्गे ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना उर्जिता उपाहारगृह, जीपीओ नाका येथे प्रवेशबंदी असले. येथील वाहने कारागृह तलाव मार्गे, दादोजी कोंडदेव स्टेडियम मार्गे वाहतुक करतील.
– ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून टाॅवर नाका, टेंभीनाक्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या बसगाड्या, रिक्षा, चार चाकी वाहनांना डाॅ. मुस चौक येथे प्रवेशबंदी असेल. येथील बसगाड्या बी-केबिन, गोखले रोड मार्गे तर इतर वाहने सॅटीस पुलाखालून डाॅ. मुस चौक येथे डावे वळण घेऊन इच्छित स्थळी जातील.
– साकेत येथून बाळकुम नाका मार्गे कशेळी येथे वाहतुक करणाऱ्या वाहनांना साकेत काॅम्प्लेक्स जवळील महालक्ष्मी मंदिराजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने रुस्तमजी टाॅवर येथून मुंबई नाशिक महामार्गाने जातील. तर कशेळी येथून साकेतच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना बाळकुम नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील बाळकुम नाका, कापूरबावडी चौकातून वाहतुक करतील.
– गोकुळनगर, मिनाताई ठाकरे चौक, खोपट, सिग्नलकडे आणि उथळसर रोड मार्गे वाहतुक करणाऱ्या वाहनांना मिनाताई ठाकरे चौक येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने उड्डाणपूलावरुन किंवा के व्हिला मार्गे वाहतुक करतील. हे सर्व वाहतुक बदल दिवसभर लागू असतील.