ठाणे : जादा पैशांचे अमिष दाखवून नागरिकांना खेळण्यातील नोटांचे बंडल देऊन नागरिकांची फसवणूक करणार्‍याला एकाला ठाणे पोलीसांनी अटक केली. संजय कुमार भारती (४१) असे फसवणूक करणाऱ्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून खेळण्यातील नोटांचे ५०० रूपयांचे ३६० बंडल (प्रत्येक बंडलमध्ये १०० नोटा), ३८ बनावट सोन्याची बिस्किटे आणि दुचाकी असा मुद्दे माल जप्त केला आहे.

ठाण्यात राहणार्‍या एका तरुणाला एका व्यक्तीने संपर्क साधून एक लाख रुपये दिल्यास पुढील तीन आठवड्यात तीन लाख रुपये मिळतील अशी बतावणी केली होती. तरुणाला संशयास्पद वाटल्याने त्याने याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कापूरबावडी पोलीसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला.

बनावट नोटा घेऊन आरोपी हे ३ नोव्हेंबरला साकेत-बाळकूम मार्गावर येणार असल्याने पोलीसांनी सापळा रचला. त्यानंतर पथकाने संजय कुमार भारती याला ताब्यात घेतले. परंतु त्याचा साथिदार तेथून पळून गेला. पोलीसांनी घटनास्थळावरून तसेच त्याच्या घरातून खेळण्यातील नोटांचे ५०० रूपयांचे ३६० बंडल, ३८ बनावट सोन्याची बिस्किटे आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी किती नागरिकांची फसवणूक केली आहे, याचा तपास पोलीसांकडून सुरू आहे.

ही कारवाई ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, उपायुक्त प्रशांत कदम, साहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जवळे, तत्त्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण माने, कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा भोंगळे, पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक नागेश पुराणिक, उपनिरीक्षक संकेत शिंदे, पोलीस हवालदार जीवन नाईक, अनिल खुस्पे, रोहन जाधव, अरुण बांगर, राजीव जाधव, राकेश भोर, मिलिंद राठोड, शितल माने, पोलीस काॅन्स्टेबल किरण धुमाळ, आरती येवले, अर्चना ढोबळे यांनी केली.