ठाणे : पोलिसांचा नागरिकांसोबत संवाद आणि सामाजिक सलोखा वाढविण्यात नागरिकांचीही मदत व्हावी यासाठी ठाणे पोलिसांनी पुन्हा एकदा ‘पोलीस मित्र’ संकल्पना सुरु केली आहे. तसेच एक ॲप देखील कार्यान्वित केले आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत, वाहतुक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यास मदत करणे, जनजागृती करणे अशी कामे पोलीस मित्र करतील.

ठाणे पोलिसांच्या हद्दीत ठाणे, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहराचा भाग येतो. पूर्वी पोलीस आणि नागरिकांमध्ये संवाद होत असे. त्यामुळे एखादा गैरप्रकार, दुर्घटना घडल्यास नागरिकांकडून तात्काळ पोलिसांना माहिती मिळत होती. परंतु गेल्याकाही वर्षांमध्ये पोलीस आणि नागरिक या दोघांमधील संवाद तुटत असल्याचे मत अनेक निवृत्त अधिकाऱ्यांचे आहे. अनेकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची माहिती नागरिकांमधून पोलिसांना पुरेशी माहिती मिळत नाही.

ठाणे पोलिसांनी नुकतेच पोलीस मित्र ॲप कार्यान्वित केले आहे. पोलीस आणि नागरिक यांच्यामधील संवाद वाढविणे, सामाजिक सलोखा, कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारीवर नियंत्रण अशा विविध कामासाठी सामान्य नागरिक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, माजी सैनिक, व्यवसायिक देखील सहभागी होऊ शकतात. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांमार्फत पोलीस मित्रांची पडताळणी आणि समन्वय साधले जाणार आहे. सगभाग घेण्याची इच्छा असणाऱ्यांनी परिसरातील पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना संपर्क साधण्याचे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे.

पोलीस मित्रांची भूमिका काय?

कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्तामध्ये पोलिसांना मदत करणे, वाहतुक नियंत्रण, विविध सामाजिक उपक्रम, शांतता-मोहलल्ला समिती यामध्ये सहभाग घेणे, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांच्या सुरक्षेसाठी जनजागृती करणे, अमली पदार्थ, नशा, दहशतवादविरोधी मोहीमांमध्ये भाग घेणे अशी भूमिका पोलीस मित्रांची असेल.