डोंबिवली : काटई – बदलापूर पाईपलाईन रस्त्यावरील हेदुटणे गाव हद्दीतील ईवा शाळेसमोर आणि नानाचा ढाबा समोरील सार्वजनिक रस्त्यावर एका जागरूक नागरिकाच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी रिक्षेतून नेण्यात येत असलेले एका प्राण्याच्या जातीचे मांस पकडले आहे. ते ४७ हजार रूपये किमतीचे आहे. मानपाडा पोलिसांच्या सूचनेवरून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या मांसाचे तुकडे ताब्यात घेऊन ते कोणत्या प्राण्याचे मांस हे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहे.

मोहम्मद अब्दुल अझीज अली शेख (५०), सुरैया मोहम्मद अझीझ अली शेख (४५) अशी या पती पत्नीची नावे आहेत. ते डोंबिवली पश्चिमेतील ठाकुरवाडी भागात राहतात. हवालदार नाना खंडू जाधव यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस ठाण्यातील माहिती, अशी काटई बदलापूर रस्त्यावर नाना ढाबा परिसरात सार्वजनिक रस्त्यावर एका रिक्षेतून एका प्राण्याचे मांस विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती या भागातील एक जागरूक नागरिक सुरज प्रजापती यांनी मानपाडा पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.

रिक्षेत एका पिशवीत प्राण्याचे मांस आणि एक महिला आणि एक पुरूष बसले होते. अनेेक लोक या रिक्षे भोवती जमा झाले होते. पोलिसांनी त्यांची ओळख पटवली. हे मांस आपण मुंब्रा येथील वसीम यांच्याकडून आणले असल्याची माहिती या दाम्पत्याने पोलिसांना दिली. हे मांस आपण कुठे नेणार होता आणि त्याची कोणाला विक्री करणार होती या पोलिसांच्या प्रश्नावर जोडप्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. बेकायदेशीरपणे ही प्राण्यांच्या मांसाची तस्करी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. घटनास्थळी ऋषिकेश माळी, रायबा हजारी, सुरज प्रजापती हे जागरूक नागरिक उपस्थित होते. ४७ हजार रूपये किमतीचे हे मांस आहे.

या मांसाचे तुकडे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी ताब्यात घेतले. या तपासणीनंतर हे मांस कोणत्या प्राण्याचे आहे हे सिध्द होणार आहे. मानपाडा पोलिसांनी रिक्षेसह या दाम्पत्याला ताब्यात घेतले. त्यांना मानपाडा पोलीस ठाण्यात आणले आणि त्यांच्या बेकायदा प्राण्यांच्या मांसाची तस्करी केली म्हणून गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हे मांस विक्री करणारा मुंब्रा येथील इसम याचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. ग्रामीण भागातून गोधन रात्रीच्या वेळेत चोरून आणायचे आणि नंतर त्या प्राण्यांची कत्तल करायची असे प्रकार ठाणे जिल्ह्यात वाढू लागले आहेत. त्यामधून असे प्राण्यांच्या तस्कारीचे प्रकार होत आहेत, असे काही सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.