ठाणे : एका नामांकित ब्रँडच्या जिन्सची हुबेहुब काॅपी करुन त्याचे उत्पादन करुन ती विक्री करणाऱ्या तिघांविरोधात भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी ५१६ जीन्स पँट, शिवण यंत्र असा साठा जप्त केला आहे.

भिवंडी येथील भुसावळ कंपाऊंड भागातील एका गोदामामध्ये एका नामांकित ब्रँडचे काॅपी वस्त्र विकली जात असल्याची माहिती एका कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. कंपनीने तात्काळ याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त कार्यालयाला दिली. त्यानुसार, शनिवारी पोलीस पथकाने भुसावळ कंपाऊंड येथे जाऊन पाहणी केली. त्यावेळी काही कामगार जिन्स पँट घडी घालून पिशवीत भरत होते. या पँटवर नामांकित कंपनीचे टॅग दिसत होते, तेथील अधिकाऱ्यांनी याबाबत कामगार आणि येथील कंपनी मालकाला विचारले असता, त्याच्याकडे कोणताही ब्रँडचा परवाना नसल्याचे समोर आले.

या घटनेत पोलिसांनी ५१६ जिन्स पँट (३०० रुपये प्रमाणे) १ लाख ५४ हजार ८०० रुपये, २ हजार ५०० रुपयांचे ब्रँडच्या कंपनीचे टॅग, ३० हजार रुपये किमतीचे एक शिवण यंत्र असा एकूण १ लाख ८७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी प्रतिलिपी अधिकार अधिनियम, १९५७ (सुधारीत अधिनियम १९८४ आणि १९९४) प्रमाणे कलम ५१, ६३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.