ठाणे : ठाण्यातील शिवसेना उपनेतेपदावरून निर्माण झालेल्या वादाला आता अधिक तीव्र स्वरूप प्राप्त झाले आहे. माजी नगरसेविका व ठाणे उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे यांनी पत्रकार परिषद घेऊन खासदार नरेश मस्के यांच्यावर जोरदार टीका केली. “दादांचे नाव घेऊन आमच्या कुटुंबाचा अपमान करू नका. आमच्या भावनांशी खेळायचा प्रयत्न केला, तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील,” असा इशारा त्यांनी दिला.

ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी स्व. अनंत तरे यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्या बाबत संजय तरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत माहेश्वरी तरे यादेखील उपस्थित होत्या. यावेळी त्या बोलत होत्या. तरे म्हणाल्या की, “उपनेतेपद हा दादांना दिलेला बाळासाहेबांचा सन्मान होता. त्यांच्या कर्तृत्वामुळेच ठाण्यात शिवसेनेची सत्ता आली. तरीसुद्धा आज त्यांच्या प्रतिमेला डाग लावण्याचा, दिघे–तरे साहेबांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. हे ठाण्याच्या परंपरेला शोभणारे नाही.”

त्यांनी खासदार मस्के यांना उद्देशून सांगितले की, “तुम्ही ठाण्याचे प्रतिनिधित्व करणारे प्रतिष्ठित व्यक्ती आहात. त्यामुळे जबाबदारीने बोला. फक्त राजकीय फायदा मिळवण्यासाठी खोटे आरोप करू नका. जर काही पुरावे असतील तर खुलेपणाने मांडा; अन्यथा लोकांना गोंधळात टाकू नका.”

महेश्वरी तरे यांनी ठणकावून सांगितले की, दादांनी शिवसेनेला चाळीस वर्षे दिली, तीन वेळा ठाण्याचे महापौर झाले आणि उपनेतेपदासारखे मानाचे पद त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मिळवले. “आज ठाण्याची सत्ता ही दिघे साहेब आणि दादांच्या आशीर्वादामुळेच आहे. तुम्ही त्या काळात कुठेही नव्हता, त्यामुळे त्यांच्या कार्यावर प्रश्न उपस्थित करू नका,” असा इशारा त्यांनी दिला.

तरे यांनी स्पष्ट केले की, शिवसेनेची सत्ता ठाण्यातील कुटुंबीयांच्या मेहनतीने स्थापन आणि टिकवली आहे. जे काय आहे ते आमच्या कष्टाचा खातोय, राजकारणात कमवून ठेवलेला आम्ही खात नाही. त्यामुळे नरेश मस्के साहेब आमच्या भावनांशी खेळू नका. आमचे हात स्वच्छता आहे, आम्ही कोणाच्या दबावाखाली काम केलेले नाही.

यावेळी कोळी महासंघाच्या माध्यमातूनही तणावाचे संकेत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. “ठाण्यात कुठलेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी आम्ही त्यांना रोखले आहे. पण जर चिखलफेक थांबली नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.