ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवरील प्रतिक्षालयामध्येय प्रतिक्षालयासह कॅफेटेरिया सुरु करण्यात आला. पूर्वी या जागेत केवळ प्रतिक्षालय होते. कॅफेटेरिया सुरु झाल्याने आता अर्ध्या जागेत प्रतिक्षालय आणि अर्ध्या जागेत कॅफेटेरिया असेल. या कॅफेटेरियात खाद्य पदार्थ, चहा, शीत पेय उपलब्ध होईल. या कॅफेटेरिया बाबत प्रवाशांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहे. काही प्रवाशांनी प्रतिक्षालयाच्या जागेत कॅफेटेरिया सुरु केल्याने नाराजी व्यक्त केली.
मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक ठाणे रेल्वे स्थानक आहे. या स्थानकातून दिवासाल पाच ते सहा लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. अनेकदा रेल्वेगाड्यांची वाहतुक विस्कळीत झाल्यावर प्रवाशांची या स्थानकात तुफान गर्दी होते. ठाणे रेल्वे स्थानकात एकूण १० फलाट आहेत. यातील फलाट क्रमांक दोनलगत पूर्वी ठाणे रेल्वे व्यवस्थापक, तिकीट तपासणीस यांचे कार्यालय होते. कल्याण, डोंबिवली, बदलापूर, आसनगावच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या धिम्या रेल्वेगाड्या फलाट क्रमांक दोनवर थांबतात. त्यामुळे या फलाटावर प्रवाशांची मोठी गर्दी असते.
काही वर्षांपूर्वी ठाणे रेल्वे स्थानकाचे नुतनीकरण झाल्यानंतर ठाणे रेल्वे व्यवस्थापक, तिकीट तपासणीस यांचे कार्यालय तोडण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी प्रतिक्षालय उभारण्यात आले. तर, व्यवस्थापकांचे कार्यालय ठाणे रेल्वे स्थानकातील वाहन तळाच्या तिसऱ्या मजल्यावर सुरु करण्यात आले. प्रतिक्षालय सुरु झाल्याने येथे उपनगरीय रेल्वेगाड्यांतील प्रवासी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांतील प्रवासी आराम करण्यासाठी येत असत. परंतु आता काही वर्षांपूर्वीच सुरु झालेल्या या प्रतिक्षालयामध्ये नुकतेच कॅफेटेरिया सुरु करण्यात आले आहे. प्रतिक्षालयाच्या एका बाजूला कॅफेटेरियासाठी जागा देण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला काही फूट जागेत प्रतिक्षालय सुरु आहे. कॅफेटेरियामध्ये खाद्य पदार्थ, शीत पेय विक्री केली जात आहे.
मध्य रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता, संंबंधित कंत्राटदारासोबत रेल्वे प्रशासनाने सेवा सुविधांच्या बदल्यात करार केला आहे. तसेच परवान्याच्या मोबदल्यात देखील रेल्वेला उत्पन्न मिळणार आहे. काही मोठ्या रेल्वे स्थानकात अशा पद्धतीने कॅफेटेरिया सुरु केल्याचा दावा त्यांनी केला.
प्रतिक्षालयाची जागा मोठी होती. आता या ठिकाणी अर्ध्या भागामध्ये कॅफेटेरिया सुरु झाल्याने प्रवाशांना मोकळी जागा मिळणे कठीण होते. रेल्वेने प्रवाशांना दिलासा मिळेल असे काही उभे करणे अपेक्षित होते. – योगेश गांगुर्डे, प्रवासी.