कल्याण : शिळफाटा रस्त्यावरील सात वर्षापासून सुरू असलेल्या काटई निळजे रेल्वे उड्डाण पुलाचे घाईघाईने उद्घाटन करून सत्ताधारी शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुलाच्या कामाचा विचका केला, अशी जोरदार टीका समाज माध्यमांत सुरू आहे. या पुलाची नियंत्रक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या विचक्याची जबाबदारी घेण्याऐवजी, शिंदे शिवसेनेचे वाटाडे मार्गदर्शक हा पूल कसा सुस्थितीत आहे हे दाखविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे चित्र काटई निळजे पुलावर आहे.
काटई निळजे उड्डाण पुलाचे घाईने उद्घाटन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार राजेश मोरे यांनी पूल वाहतुकीसाठी खुला केल्याचे जाहीर केले. त्यानंतर काही तासात पुलावरील अपघातांमुळे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या पुलाच्या घाईच्या उद्घाटनावरून प्रवाशांनी समाज माध्यमांतून शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीका केल्याने सोमवारी दुपारी शिंदे शिवसेनेतील एक वाटाडे मार्गदर्शक २७ गाव हद्दीतील शिवसैनिकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक काटई निळजे रेल्वे उड्डाण पुलावर आले. पुलाची पाहणी करून ते काटईचे अर्जुन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात बसले. त्यानंतर आमदार राजेश मोरे विधीमंडळ अधिवेशन सोडून काटई पुलावर हजर झाले. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पुलावर गर्दी केली.
या पुलाच्या कामावरून शिंदे शिवसेना नाहक टीकेचे लक्ष्य बनल्याने त्यावर उतारा म्हणून शिंदे शिवसेनेतील वाटाड्या मार्गदर्शकाच्या सूचनेवरून संध्याकाळी काटई निळजे पुलावर डांबर, ग्रीटचे तयार झालेले उंचवटे काढणे, पुलावर नवीन रासायिनक गुळगुळीत रस्त्यासाठी वेष्टन टाकण्यासाठी धावपळ करण्यात आली. तात्काळ पंधरा ते वीस मजूर आणण्यात आले. पुलावर झाडलोट करून पूल सुस्थितीत करण्याचे प्रयत्न करण्यात आले. एमएसआरडीसीने ठेकेदाराकडून करून घ्यायची कामे. शिंदे शिवसेनेतील एक मार्गदर्शक हिरीरिने करत असल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पूल निकृष्टच – राजू पाटील
काटई निळजे उड्डाण पुलाचे काम निकृष्टच आहे. यापूर्वीच आपण या पुलाची तपासणी व्हीजेटीआयच्या तज्ज्ञांकडून करण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे. या पुलाचे घाईने उद्घाटन करून सत्ताधाऱ्यांनी चोथा आणि चुथाडा केलाच आहे. याविषयी सत्ताधारी ठेकेदाराला काही बोलत नाहीत. कारण खाल्लेल्या मलिद्याच्या मीठाला जागले पाहिजे. त्यामुळे ते ठेकेदाराला काय बोलणार, असा प्रश्न मनसे नेते राजू पाटील यांनी केला.
पुलाचे घाईने उद्गघाटन करून प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या नेत्यांवर, एमएसआरडीसीचे अधिकारी आणि ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीणचे उपजिल्हाप्रमुख राहुल भगत यांनी मानपाडा पोलिसांकडे केली आहे.
काटई निळजे पुलाचे काम निकृष्ट पध्दतीने करण्यात आले आहे. या पुलाची पूल बांधकाम तज्ज्ञांकडून तपासणी करून दोषींंवर कठोर कारवाई करावी. या पुलाच्या कामाच्या ठेकेदाराचे तोपर्यंत देयक अदा करण्यात येऊ नये. – राजू पाटील मनसे नेते.