ठाणे : ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग उभारताना मुल्लाबाग परिसरातील हरित पट्टा नष्ट करू नका आणि मुल्लाबागऐवजी युनी अपेक्स कंपनीपर्यंत भुयारी मार्ग उभारा, अशी प्रकल्पालगतच्या गृहसंकुलातील रहिवाशांची मागणी कायम असून त्याचे प्रतिबिंब गणेशोत्सवाच्या देखाव्यातून येथील संकुलांनी उभारून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून रहिवाशांनी आपल्या मागण्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यानिमित्ताने रहिवाशांंचा लढा अद्यापही सुरूच असल्याचे चित्र आहे.
ठाणे-बोरिवली भुयारी मार्गामुळे प्रवासाचा कालावधी कमी होणार असला तरी या प्रकल्पाच्या कामामुळे स्थानिक रहिवाशांना प्रदुषण तसेच वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय, प्रकल्पामुळे मुल्लाबाग परिसरातील हरीत पट्टा नष्ट होण्याबरोबरच भविष्यात नागरिकांना वळसा घालून प्रवास करावा लागणार असून त्याचबरोबर वाहतूक कोंडीसह प्रदुषणाच्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे प्रकल्पालगतच्या संकुलांनी प्रकल्पास कडाडून विरोध केला होता. स्थानिक रहिवाशांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर शिंदे यांनी अधिकाऱ्यांना काही आदेश दिले होते. असे असले तरी, जोपर्यंत मागण्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत स्थानिक रहिवाशांचा लढा सुरूच राहणार असल्याचे चित्र गणेशोत्सवाच्या निमित्ताने दिसून आले आहे.
ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पालगत असलेल्या आणि प्रकल्पाच्या आराखड्याचा सर्वाधिक त्रास होत असलेल्या कॉसमॉस लाऊंज गृहसंकुलातील रहिवाशांनी गणेशोत्सवाच्या देखाव्यातून आपल्या मागण्या मांडून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग आराखड्यानुसार उभारल्यास हरित पट्टा नष्ट होईल. तसेच या मार्गामुळे परिसरातील नागरिकांना वळसा घालून प्रवास करावा लागले आणि त्यात त्यांचे इंधन आणि वेळही वाया जाईल. या मार्गावर वाढणाऱ्या वाहनांमुळे कोंडी होऊन त्याचा त्रास नागरिकांना होईल. हे सर्व टाळण्यासाठी हा मार्ग मुल्लाबागऐवजी युनी अपेक्स कंपनीपर्यंत भुमिगत नेला तर, हरित पट्टाही शाबुत राहील आणि नागरिकांनाही त्रास होणार नाही, असे चित्र देखाव्यात मांडले आहे. या भागातील काही संकुलांनी आणि रहिवाशांनीही अशाचप्रकारचे देखावे सादर करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
तेव्हा ठरले देखावा उभारण्याचे
कॉसमॉस लाऊंजमधील क्लब हाऊसमध्ये संकुलाचा गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून त्याठिकाणी ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाचा देखावा उभारण्यात आला आहे. याबाबत शहरे रस्ते मार्गे एकमेकांना जोडणे पण, त्यासोबत निसर्गाचे रक्षण करणे या संकल्पनेवर आधारित हा देखावा आहे. या देखाव्याची उभारणी कल्पना कॉसमॉस लाउंज असोसिएशनचे अध्यक्ष नितीन सिंग, सल्लागार पंकज ताम्हाणे, स्टीव्ह थॉमस आणि पल्लवी शेट यांची आहे तर, अॅडव्होकेट अस्मिता सातारे यांनी देखावा उभारण्याचे काम केले आहे. ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग प्रत्यक्षात कसा असावा, त्याचा नागरिकांना त्रास कसा होणार नाही आणि हा प्रकल्प राबविताना हरित पट्टा कसा शाबूत राहू शकतो, हे देखाव्यातून दाखविण्याचा प्रयत्न आम्ही केला असल्याचे पंकज ताम्हाणे यांनी सांगितले. तर, ठाणे-बोरिवली प्रकल्पाविरोधात आंदोलन आणि बैठका सुरू होत्या, त्याचवेळी यंदाच्या गणेशोत्सवात हा देखावा उभारण्याची कल्पना सुचली होती, असे नितीन सिंग यांनी सांगितले.