ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरात एका रिक्षा चालकाने प्रवाशी महिलेसोबत अरेरावी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने याप्रकरणाचे चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित केल्यानंतर रविवारी रात्री ठाणे वाहतुक पोलिसांनी संबंधित रिक्षा चालकाविरोधात ई-चलानद्वारे दंडात्मक कारवाई केली.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून दिवसाला लाखो प्रवासी वाहतुक करतात. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून सार्वजनिक वाहतुक पुरेसी नसल्याने अनेकजण रिक्षाने प्रवास करतात. याचाच गैरफायदा काही मुजोर रिक्षा चालक घेतात. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात यापूर्वी प्रवासी आणि रिक्षा चालकांमध्ये वादाचे अनेक प्रकार उघड झाले होते. काही दिवसांपूर्वीच, ठाणे रेल्वे स्थानक परिसराती गावदेवी परिसरात रिक्षा चालकांच्या मुजोरी विरोधात प्रवाशांनी आंदोलन केले होते.
त्यानंतर शहरातील रिक्षावर अवलंबून असलेल्या प्रवाशांच्या समस्येचा मुद्दा ऐरणीवर आला होता. ठाणे वाहतुक पोलिसांनी चौथ्या सीट घेऊन प्रवासी वाहतुक करणाऱया रिक्षा चालकांविरोधात कारवाई केली. परंतु रिक्षा चालकांनी बेकायदेशीरित्या तीन प्रवासी नेण्यास सुरुवात केल्यानंतर प्रवासी भाड्यामध्ये किमान ५ ते १० रुपयांची वाढ केली. रिक्षा चालकांवर आवर नसल्याची चर्चा आता ठाणे शहरात होऊ लागली आहे. दरम्यान, आता एका रिक्षा चालकाच्या मुजोरीचा प्रकार समोर येत आहे.
चित्रीकरणात दिसत असलेल्या माहिती नुसार, ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून प्रवासी महिला एका ठिकाणी जात होती. परंतु रिक्षा चालकाने जवळचे भाडे असल्याचे कारण सांगत पुढे जाण्यास नकार दिल्याचे चित्रफीतीतून कळते आहे. या प्रकारानंतर महिलेने तिच्या मोबाईलमध्ये रिक्षा चालकाच्या वागणूकीचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. जवळच्या भाड्यावरून ती महिला प्रवासी आणि रिक्षा चालकामध्ये वाद झाल्याचे यात दिसते आहे.
त्यानंतर रिक्षा चालकाने महिलेसोबत अरेरावी करण्यास सुरुवात केली. तसेच, तिला हाताने मारण्याचा प्रयत्न केल्याचेही चित्रीकरणात दिसते. या घटनेची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर संबधित रिक्षा चालकाविरोधात ठाणे वाहतुक पोलिसांनी ई चलानद्वारे ५०० रुपये दंडात्मक कारवाई केली.