ठाणे : जिल्ह्यातील खाडीतून होणाऱ्या अनधिकृत वाळू उपसाबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर आणि रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने ठाणे पोलीस आयुक्तालयाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंब्रा ते कल्याण दरम्यान खाडी किनारी असलेल्या रेल्वे ट्रॅक व कांदळवन परिसरात पुढील दोन महिने रेती उत्खनन रोखण्यासाठी मनाई लागू करण्यात आली आहे. वाळू माफियांकडून अनेकदा रेल्वे पुलांच्या तळाशी थेट वाळू उपसा केला जात असल्याचे अनेकदा समोर आले. यावर जिल्हा रेती गट विभागाने वेळोवेळी कारवाई देखील केली आहे. मात्र याचे वाढते प्रमाण लक्षात घेत वाळू माफियांविरुद्ध कठोर मोहीम जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासन यांनी संयुक्त मोहीम हाती घेतली आहे.

ठाणे जिल्ह्याला मोठा खाडी किनारा लाभला आहे. या खाडी परिसरातून मोठ्या प्रमाणात अनेकदा वाळू माफियांकडून अवैध पद्धतीने उपसा केला जातो. या अवैध उपशाच्या विरोधात जिल्हा रेती गट विभागाकडून अनेकदा कारवाई केली जाते. मात्र तरीही वाळू माफिया रात्रीच्या वेळी तसेच अधिकाऱ्यांची नजर चुकवून हा उपसा करत असतात. मात्र खाडीतून जाणाऱ्या रेल्वे पुलाच्या तळाशी आणि कांदळवन असलेल्या भागात या उपशाचे प्रमाण वाढल्याने याबाबत गणेश पाटील यांनी मुंबई उच्चन्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची न्यायालयाने गंभीर दखल घेतली.

यानंतर तातडीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत महसूल विभाग, महाराष्ट्र सागरी मंडळ, पोलीस यंत्रणा व रेल्वे प्रशासनाने एकत्र येऊन या प्रश्नावर चर्चा केली. यावर उपाय म्हणून रेल्वेकडून गॅबियन बंधारे उभारण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती यावेळी रेल्वे प्रशासनाने दिली. तरी संभाव्य धोके लक्षात घेऊन प्रशासनाने अधिक कठोर पाऊल उचलले आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील दोन महिने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही रेल्वे वा रस्ते पुलाच्या दोन्ही बाजूंनी ६०० मीटर म्हणजेच सुमारे दोन हजार फूट अंतरात वाळू किंवा रेती उत्खननास परवानगी दिली जाणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करून अवैध उत्खनन करणाऱ्या बोटी, सॅक्शन पंप किंवा यंत्रसामग्रीवर कठोर कारवाई केली जाणार असून खाडी किनाऱ्यावरील कांदळवन क्षेत्रालाही विशेष संरक्षण मिळणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा नोंदवून शिक्षा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत विशेष शाखा पोलिस उपायुक्त मीना मकवाणा यांनी आदेश जारी केले आहेत.

रेल्वे पुलाच्या तळाशी उपसा का ?

अनेकदा वाळू माफियांकडून रेल्वे पुलाच्या तळाशी अधिक उपसा केला जातो. पुलाचे खांबा आणि त्यातील अंतर थोडे कमी असल्याने याचा आधार घेत माफिया आपल्या लहान बोटी याठिकाणी लावून उपसा करतात. तर अधिकारी याविरोधात कारवाई करण्यासाठी गेले असता या कमी अंतरातून अधिकाऱ्यांच्या मोठ्या बोटी घेऊ जाणे थोडे अवघड होते. याचा फायदा घेत माफिया लागलीच तेथून पळ काढतात. अथवा थेट अधिकाऱ्यांवर पेट्रोल बॉम्ब अथवा दगडफेक आणि काचेच्या बाटल्या फेकून हल्ला करतात. याआधीच्या घटनांमध्ये काही वेळेस असे प्रकार उघड झाले आहेत.

जिल्हा रेती गट विभागाच्या माध्यमातून अधिकृत पद्धतीने रेती उपसा करून त्याचा शासकीय दरानुसार लिलाव करण्यात येतो. मात्र पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जुलै मध्य ते सुमारे सप्टेंबर अखेर पर्यंत हा अधिकृत उपसा बंद ठेवण्यात येतो. अनधिकृत पद्धतीने रेती उपसा करणाऱ्यांविरोधात गेल्या काही महिन्यात कठोर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये १२ बार्ज, १९ सक्शन पंप आणि ५९ रेती कुंड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. तर २ कोटी ८० लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.