ठाणे : सरळगाव येथे एका ट्रकच्या धडकेत पादचारी मोहन नाकुडा (२०) यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात ट्रक चालक रईस शहा (४५) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अपघातानंतर रईस याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या तीन दुचाकींनाही धडक दिली.
येथील नामपाडा भागात मोहन हे वास्तव्यास होते. ते सरळगाव मार्गावरून पायी जात असताना भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर ट्रक चालक रईस याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याकडेला उभ्या केलेल्या इतर तीन दुचाकींना धडकला.
दुचाकींवर चालक नसल्याने यात कोणीही जखमी झाले नाही. या अपघाताची माहिती किन्हवली पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी रईस याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती किन्हवली पोलिसांनी दिली.
