ठाणे – येथील नौपाडा मधील सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना शेतीच्या कामांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी दरवर्षी विशेष उपक्रम राबवला जातो. यंदाही ५ जुलै रोजी येऊर येथील अनंताश्रम संस्थेच्या शेतात विद्यार्थ्यांसाठी भात लागवड आणि कापणी हा उपक्रम होणार आहे.
ठाण्यातील नौपाडा परिसरात असणाऱ्या सरस्वती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांना सर्व गोष्टींचे प्रात्यक्षिक ज्ञान प्राप्त व्हावे या हेतूने विविध उपक्रम राबवण्यात येत असतात. यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करून अंदाजपत्रक तयार करण्यास सांगण्यात आले होते. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. तसेच चिमुकल्यांसाठी साक्षरतेची जत्रा हा उपक्रम देखील शाळा राबवते.
अशाचप्रकारे शहरातील विद्यार्थ्यांना शेतीविषयक कामांची माहिती व्हावी, कृषी क्षेत्राबद्दल जागृकता निर्माण व्हावी, शेतकऱ्यांच्या कष्टाचे महत्त्व आणि अन्नाची किंमत कळावी अशा विविध हेतूने शेती लागवड आणि कापणी हा उपक्रम राबविला जातो. या अंतर्गत विद्यार्थ्यांना येऊर येथील अनंताश्रम येथे विद्यार्थी शेतात जाऊन शेती कामांचा प्रत्यक्ष अनुभव घेतील. हा उपक्रम शिक्षकांच्या उपस्थित होणार आहे. येऊर येथील अनंताश्रमात शनिवार, ५ जुलै रोजी सकाळी ८ वाजता असणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शेतीविषयक प्रात्यक्षिक ज्ञान दिले जाणार आहे.
शाळेत विद्यार्थ्यांसाठी राबवले जाणारे उपक्रम
सरस्वती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील अभ्यासाबरोबरच प्रात्य७िक ज्ञाना देण्यावर अधिक भर दिला जातो. या अंतर्गत विविध उपक्रम राबवले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांना घरातील आर्थिक नियोजनाबाबत अभ्यास करण्यास सांगण्यात आले होते. तर यंदाच्यावर्षी शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेचा ९ कोटी ८९ लाखांचा अर्थसंकल्प मांडला. याचबरोबर विज्ञान प्रयोग देखील घेण्यात येतात. तसेच लहान चिमुकल्यांना अक्षर, रंग, आकार यांची ओळख व्हावी म्हणुन साक्षरतेची जत्रा हा उपक्रम देखील पार पडतो.
प्रतिक्रिया
शहरातील विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्राची माहिती व्हावी, त्याचे प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे यासाठी आवर्जुन हा उपक्रम राबविला जातो. – सुरेंद्र दिघे, कार्यकारी विश्वस्त, सरस्वती मंदिर ट्रस्ट, ठाणे.