ठाणे – गणपतीचे उद्या सर्वत्र ठिकाणी आगमन होणार आहे. गणेशोत्सवानिमित्त सर्व शाळांना सुट्टी पडली आहे. परंतू, ठाणे शहरातील एक शाळा अशी आहे की, या शाळेत गणेशोत्सवाच्या काळात विद्यार्थ्यांना परिक्षेचा जाच करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात परिक्षेचे नियोजन करु नये असे परिपत्रक ठाणे महापालिकेच्या वतीने काढले असतानाही ठाण्यातील या शाळेत गणेशोत्सवाच्या काळात परिक्षांचे नियोजन आखण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तसेच पालकांमध्ये नाराजी पसरली आहे.

पूर्वी गणेशोत्सवाच्या काळात शाळा सुरु असायच्या काही शाळांमध्ये गणेशोत्सवाच्या कालावधीत अनेकदा शाळांमध्ये परिक्षा घेतल्या जात होत्या. यामुळे या विद्यार्थ्यांना गणेशोत्सवात मौजमज्जा करता येत नव्हती. गणेशोत्सवात शाळांना सुट्टी मिळावी अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात येत होती. त्यानुसार २०१० पासून गणेशोत्सवात ठाण्यातील सर्व शाळांना सुट्ट्या मिळण्यास सुरुवात झाली आहे. तसेच गणेशोत्सवाच्या काळात शाळांमध्ये परिक्षांचे नियोजन करु नये असा २०१५ चा शासन आदेश आहे. तर, ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून देखील गणेशोत्सवाच्या काळात शाळेत परिक्षांचे नियोजन करु नये असे परिपत्रक २२ ऑगस्ट रोजी काढण्यात आले होते.

तरी, देखील ठाण्यातील कोलशेत भागातील पीएम केंद्रीय स्कूल या शाळेत यंदा गणेशोत्सवाच्या काळात परिक्षा घेतल्या जात आहेत. या परिक्षा २० ऑगस्ट पासून सुरु झाल्या असून त्या थेट २ सप्टेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. इयत्ता सहावी ते इयत्ता अकरावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या या परिक्षा होत असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.

२०१० सालापासून मनविसेच्या मागणी नुसार गणेशोत्सवात ठाण्यातील सर्व शाळांना सुट्ट्या मिळत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात परीक्षांचे नियोजन करू नये असा २०१५ साली शासनाने अध्यादेश देखील काढला आहे. मात्र, यावर्षी पीएम श्री केंद्रीय स्कूल कोलशेत या शाळा व्यवस्थापनाने परीक्षांचे नियोजन केलेले आहे. शासन निर्णयाचा अवमान करणाऱ्या शाळेविरोधात शिक्षणाधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. – संदीप पाचंगे, सरचिटणीस (महाराष्ट्र राज्य ) मनसे विद्यार्थी सेना.

शाळा प्रतिक्रिया

आमच्या शाळेत गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही चाचणी परिक्षा होत नाहिये. ज्या परिक्षा ठेवण्यात आल्या आहेत त्या, आमच्या शाळेच्या पवई येथील मुख्य केंद्रातून नियोजित करण्यात आल्या आहेत. या परिक्षांचे वेळापत्रक आम्ही बदलू शकत नाही. कारण, या परिक्षा संपूर्ण राज्यातील आमच्या केंद्राच्या शाळेत एकाच वेळी होत आहेत. – गौतम वेद प्रकाश, प्राचार्य, पीएम श्री केंद्रीय स्कूल, कोलशेत