ठाणे : ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाने सर्व शाळांना मराठी नामफलक लावणे सक्तीचे केले आहे. शासनाच्या २०१४ च्या निर्णयाची आठवण करून देत आता पालिका प्रशासनाने काटेकोर अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. ही नक्कीच आनंदाची बाब आहे परंतु, केवळ फलक मराठीत असले तरी मराठीला न्याय मिळणार नाही. यामुळे अधिकृत नोंदी आणि कागदपत्रे इंग्रजी किंवा हिंदीऐवजी मराठीतच ठेवण्याचा ठोस आग्रह धरणार आहे, अशी भूमिका ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने घेतली आहे.
मराठी ही राज्यभाषा असून ती केवळ फलकांपुरती मर्यादित ठेवता येणार नाही. शाळांतील दैनंदिन कामकाज, पत्रव्यवहार, नोंदी, अर्ज, आदेश, हजेरी, हिशेब या सगळ्याचा व्यवहार मराठीतच व्हायला पाहिजे. अन्यथा मराठी फलक हा केवळ दिखावा ठरेल, असे मत काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केले आहे. मराठी माणसाच्या मुलांच्या शाळेत जर व्यवहार इंग्रजीत होत असतील, तर नामफलक मराठीत असून काय साध्य होणार आहे. खरा सन्मान तेव्हाच होईल, जेव्हा शाळांचे रोजनिशीपासून निकालपत्रापर्यंत सर्व कागदपत्रे मराठीत मिळतील,” असे चव्हाण यांनी सांगितले.
ठाणे महापालिका शिक्षण विभागाने शाळांना आठ दिवसांच्या आत मराठी नामफलक लावण्याचे आदेश दिले असले, तरी काँग्रेसच्या शाळेतील सर्वच पत्रव्यवहार मराठीतून करण्याची मागणी केली आहे. भाजप-शिवसेना शासकीय स्तरावर मराठी फलकांवरच भर देत असताना, काँग्रेसने आता मराठी भाषेच्या दैनंदिन वापराचा मुद्दा पुढे आणत सरकारला अडचणीत टाकले आहे. मराठी भाषेच्या रक्षणासाठी सतत लढा देणाऱ्या संघटनांनीही या मागणीचे स्वागत केले आहे. शासनाचे आदेश फलकापुरते मर्यादित ठेवले, तर मराठीची दैनंदिन उपेक्षा थांबणार नाही. नामफलकांबरोबरच प्रशासनिक कागदपत्रेही मराठीत आली, तरच मुलांना खरी भाषा शिकायला मिळेल,” असे अनेक संघटनांनी मत व्यक्त केल्याचे चव्हण यांनी म्हटले आहे.
ठाण्यातील अनेक पालकांनीही यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. “मुलं शाळेत शिकतात ती भाषा आणि शाळेच्या कार्यालयात होणारा व्यवहार या दोन्ही मराठीतच असावेत. मुलांना मातृभाषेचे बळ तेव्हाच मिळेल,” असे एका पालकाचे म्हणणे आहे.
आता ठाणे महापालिका शिक्षण विभागाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केवळ फलकांपुरते आदेश राहतील, की काँग्रेसच्या मागणीमुळे दैनंदिन शालेय पत्रव्यवहारही मराठीत करण्याची अंमलबजावणी होईल, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत, असे चव्हाण म्हणाले.