शहापूर : शहापूरच्या वनाधिकाऱ्यांनी रान डुकरांची तस्करी करणाऱ्या तिघांना रविवारी अटक केली. वन विभागाने रान डुकरांना पुन्हा जंगलात सोडून दिले आहे. तर तस्करांना चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
गणेश भीमा पवार, दिलीप राजेंद्र पवार आणि राजेंद्र सखाराम पवार अशी तस्करांची नावे आहेत. शहापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी यांना वन्य प्राण्यांची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. शहापूरचे उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, साहाय्यक वनसंरक्षक अभिजीत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी, वनपाल संदीप केदार, वनरक्षक संतोष खंदारे आणि वनमजुर अनंता पडवळ या वन विभागाच्या पथकाने मुंबई – नाशिक महामार्गावरील आटगाव, आसनगाव येथे सापळा लावला.
मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास एक संशयित मालवाहू वाहन थांबवण्याचा वन विभागाच्या पथकाने प्रयत्न केला. मात्र, त्या वाहन चालकांनी वाहन थांबविले नाही. पथकाला संशय आल्याने त्यांनी मालवाहू वाहनाचा पाठलाग सुरु करत ते वाहन आसनगाव येथे अडवले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये रानडुक्कर असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पथकाने वाहन चालक गणेश आणि त्याच्या साथिदार दिलीप यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता मुख्य सूत्रधार राजेंद्र सखाराम पवार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पथकाने राजेंद्र पवार याला घोटी येथून ताब्यात घेतले. याप्रकरणी वाहनासह एकूण १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच रानडुकरांना जंगलात सोडून देण्यात आले आहे. या रान डुकरांना विक्रीसाठी एका हाॅटेलमध्ये नेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.