डोंबिवली : लोकसभा, विधानसभा निवडणूक काळात डोंबिवली विधानसभा, कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात जीव तोडून काम करूनही आता आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळते की नाही. शिंदे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार पक्ष) पालिकांमध्ये महायुतीने लढले तर यामध्ये आपले ठिकाण काय असेल. असा अनेक अंगांनी विचार करून डोंबिवलीतील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हळूहळू भाजप, शिंदे शिवसेनेचा पदर धरण्यास सुरूवात केली आहे.
ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी मात्र आगामी पालिका निवडणुकांचा विचार करून ठाकरे गटाच्या डोंबिवली शहर परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या आगामी पालिका रणनितीचा भाग म्हणून विभागवार बैठका सुरू केल्या आहेत. या बैठकीत आगामी पालिका निवडणुकीत पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर काय आणि कशी आखणी करायची असे मार्गदर्शन जिल्हाध्यक्ष म्हात्रे करत आहेत.
या विभागवार बैठका सुरू असल्या तरी गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील डोंबिवली पूर्व, पश्चिमेतील काही पदाधिकारी, कार्यकर्ते कोणाच्या नजरेत येणार नाही, अशा पध्दतीने स्थानिक भाजप पदाधिकारी, शिंदे शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. दोन दिवसापूर्वी ठाकरे गटातील काही कार्यकर्ते डोंबिवली पश्चिमेतील भाजपच्या कार्यालयात एका पदाधिकाऱ्यासोबत गुफ्तगू करत बसले होते, अशी विश्वसनीय माहिती आहे.
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे डोंबिवली शहरात कधी फिरकत नाहीत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कधी मार्गदर्शन करत नाहीत, अशी खंत या पदाधिकऱ्यांची आहे. शिंदे शिवसेना आणि भाजप पालिकेच्या चार सदस्य प्रभागांमध्ये खमक्या उमेदवार पाहिजे म्हणून स्थानिक आणि इतर पक्षांमधून येणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे जोरदार स्वागत करत आहेत. त्यामुळे आपण काम करत असलेल्या प्रभागात आपणास ठाकरे पक्षातून उमेदवारी मिळाली नाही तर मग काय करायचे असे प्रश्न अनेक इच्छुक ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सतावत आहेत.
हे चिंतातूर कार्यकर्ते ठाकरे गटाच्याही बैठकांना हजेरी लावत आहेत. तेथे पक्षातून उमेदवारी मिळाली नाहीतर काय करायचे या विचाराने हळूच भाजप, शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून आपण पक्ष प्रवेश मिळेल का. पक्षात प्रवेश केल्यावर आपणास पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी मिळेल का, अशा अनेक बाजुने विचार करत असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
दरम्यान, ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने मात्र, आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते एकजीव आहेत. ते निष्ठेने पक्षासाठी काम करत आहेत. ते कोणत्याही पक्षात जाणार नाहीत. आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे विभागवार बैठका घेत आहेत. त्या बैठकांना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असे सांगितले.आमचा एकही कार्यकर्ता, पदाधिकारी अन्य पक्षात जाणार नाही. तो पक्षप्रमुुख उध्दव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहे, असे या पदाधिकाऱ्याने सांगितले.
