Thane Bus Stuck on Gokhale Road: ठाणे शहरातील नौपाडा भागात दिवाळी निमित्ताने ग्राहकांनी खरेदीसाठी दुकानात यावे, यासाठी येथील व्यापाऱ्यांनी गोखले रोड, राम मारूती रोड, नौपाडा या परिसरात जाहिरातींच्या कमानी, फलक, विद्युत रोषणाई केली आहे. परंतु याच कमानी आता वाहतूकीसाठी अडथळ्याच्या ठरू लागल्या आहेत. शुक्रवारी दुपारी गोखले रोड परिसरात ठाणे महापालिका परिवहन सेवेची (टीएमटी) बसगाडी येथील कमानीमुळे अडकून होती. हा रस्ता निमुळता असल्यामुळे या भागातून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना कोंडीचा सामना सहन करावा लागला.

दिवाळी निमित्ताने दरवर्षी नौपाडा, गोखले रोड परिसरात फलकबाजी केली जाते. दसरा साजरा झाल्यानंतर दिवाळीपुर्वीच ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात कमानी आणि फलक उभारले आहेत. या कमान्यांसाठी लागणारे बांबू दुभाजकाला लागून उभारलेले आहेत. त्यामुळे ते वाहतूकीस अडथळे ठरत आहेत. हा मार्ग अरुंद असल्यामुळे एखादे वाहन बंद पडले किंवा अपघात झाल्यास मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागतो.

हा मार्ग ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने वाहतूक करण्यासाठी महत्त्वाचा असल्याने हरि निवास, तीन हात नाका, गावदेवी या भागातून हजारो वाहने वाहतूक करतात. तसेच ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या (टीएमटी) बसगाड्या देखील याच मार्गावरून ये – जा करतात. शुक्रवारी दुपारी ठाणे स्थानकाच्या दिशेने वाहतूक करणारी टीएमटी बसगाडी गोखले रोड मार्गावर आली असता येथे उभारण्यात आलेल्या कमानीचा अडथळा निर्माण झाला.

कमानीचा बांबू बसगाडीच्या मागील भागात अडकल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. तसेच बसगाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही त्याचा फटका सहन करावा लागला. काही वेळाने येथील नागरिकांनी एकत्रित येऊन बसगाडीला अडकलेला बांबू काढला. त्यानंतर येथील वाहतूक सुरळीत झाली.