ठाणे : येथील वागळे इस्टेट भागातील ठाणे परिवहन उपक्रमाच्या (टिएमटी) मुख्य दोन प्रशासकीय इमारती धोकादायक (सी२-बी) असल्याने त्यांची दुरुस्ती करण्याचे संरचनात्मक परिक्षणात अहवाल आठ वर्षी म्हटले होते. मात्र, अद्यापही इमारतींची दुरुस्ती करण्यात आलेली नसल्यामुळे परिवहन उपक्रमाचा कारभार धोकायदायक इमारतीमधून सुरू असून येथील अधिकारी आणि कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करीत असल्याचा दावा ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केला आहे.
ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाची मुख्य प्रशासकीय इमारत वागळे इस्टेट भागात आहे. या इमारतीचे बांधकाम १९९८ साली करण्यात आले होते. तेव्हापासून या इमारतीची मोठ्या स्वरूपाच्या कुठलीही दुरुस्ती करण्यात आली नव्हती. या दोन्ही इमारतींच्या बाहेरील बाजूची भिंत आणि आरसीसी बांधकाम नादुरुस्त झाल्यामुळे २०१७ मध्ये इमारतीच्या बांधकामाचे संरचनात्मक परिक्षण करण्यात आले होते. यामध्ये या दोन्ही इमारती सी२ बी या श्रेणीत दर्शविण्यात आली होती. सी-२ बी म्हणजे इमारत रिकामी न करता त्याची संरचनात्मक दुरुस्ती करणे. त्यामुळे या इमारतीची तातडीने दुरुस्ती केल्यास तिचे आयुर्मान किमान १५ ते २० वर्षे वाढेल असे वर्तविले जात होते. परंतु या परिक्षण अहवालाला आठ वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटून
ही इमारतीच्या दुरुस्तीचे कुठलेही काम करण्यात आलेले नसून यामुळे इमारतींची दुर्दशा झाल्याने कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे, असा दावा राहुल पिंगळे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र पाठवले.
या इमारतीत वाहक-चालक विश्रांती कक्ष, तिकिटांचा साठा, रेकॉर्ड रूम, कॅश रूम, युनियन कार्यालय असून काँग्रेसच्या शिष्टमंडळाने परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांची भेट घेत इमारतींची पाहणी केली. त्यावेळी इमारतीचे खांब आणि बाहेरील बाजूचे प्लास्टर बरेच ठिकाणी खराब झाले आहेत. इमारतीत पाणी गळती होत आहे. इमारतीचे आतील भागातील प्लास्टर पडत असल्याचे निदर्शनास आले, असे पिंगळे यांनी सांगितले. ठाणे महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून यादी जाहीर करते. कारण, पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असते. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या असून त्यात नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. असे असतानाही शेकडो कर्मचारी काम करत असलेल्या स्वतःच्या इमारतींकडे मात्र महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोपही त्यांनी केला. भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये यासाठी या दोन्ही इमारतींचे तातडीने संरचनात्मक परिक्षण करून प्राप्त होणाऱ्या अहवालानुसार आवश्यक दुरुस्ती अथवा अतीधोकादायक ठरल्यास त्यांचा पुनर्विकास हाती घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.