ठाणे – पुरातत्वाबाबत ऐकले, वाचले की समोर येते ते म्हणजे शिलालेख, मूर्ती, हत्यारे आणि भांडी. मात्र दगड आणि मातीशिवायसुद्धा अनेक गोष्टी पुरातत्वात आहेत. याच पुरातत्वातील गमती जमती ठाण्यात उलगडल्या जाणार आहेत. प्राच्यविद्या अभ्यास संस्थेच्यावतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून शनिवार, २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जोशी बेडेकर महाविद्यलयाच्या आवारातील पाणिनी सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे.

ठाण्यातील प्राच्यविद्या अभ्यास संस्थेच्यावतीने विविध ऐतिहासिक संस्कृतीचे जतन केले जाते. तसेच इतिहास, पुरातत्व, गड किल्ले, ऐतिहासिक वास्तूंची जडणघडण त्यांच्यातील विविध पैलू व्याख्यानाच्या माध्यमातून उलगडले जातात. पुरातत्व म्हणजे केवळ शिलालेख, मूर्ती, हत्यारे, भांडी असे अनेकांना वाटते. त्यामुळे हा कंटाळवाणा विषय वाटू लागतो. दगड आणि मातीशिवायसुद्धा अनेक गोष्टी पुरातत्वात आहेत, हे अनेकांना माहित नसल्याने या विषयाचे अभ्यासक कमी आढळतात.

मात्र, या कंटाळवाण्या विषयात देखिल गमती जमती दडलेल्या असतात. याच पुरातत्वातील गमती जमती उलगडण्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्राच्यविद्या अभ्यास संस्थेच्या वतीने हे व्याख्यान आयोजित करणयात आले आहे. यावेळी सहाय्यक प्राध्यापक अंकुर काणे आणि सहाय्यक प्राध्यापिका साईश्रृती भट्ट या गमतीजमती सांगणार आहेत. व्याख्यानानंतर उपस्थितांच्या शंकांचे निरसन देखील करण्यात येणार आहे. तरी, इतिहास, पुरातत्व प्रेमींनी उपस्थिती दर्शवून या गमती जमतींचा आनंद घ्यावा असे आवाहन संस्थेतर्फे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर आणि डॉ. महेश बेडेकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधी उलगडल्या इतिहासाच्या गमतीजमती

काही दिवसांपुर्वी प्राच्यविद्या अभ्यास संस्था, ठाणे आणि इतिहासाच्या पाऊलखुणा यांच्या संयुक्त विद्यमाने पुरातत्वीय वस्तू आणि छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात अश्मयुगातील हत्यारे, हडप्पा अवशेष, नाणी तसेच लेणी यांसारखे विविध पुरातन वस्तू तसेच त्यांचे छायाचित्र प्रदर्शनात मांडण्यात आल्या होते. तसेच अश्मयुगातील हत्यारे, हडप्पा संस्कृतीतील मडक्यांचे अवशेष, महाजनपद काळातील नाणी तसेच लेणी, मंदिरे, दुर्ग, इत्यादींची छायाचित्रे तसेच वस्तू मांडण्यात आलेल्या होत्या. यात २५ छायाचित्रे, ८ ते १० नाणी तसेच काही पुरातत्वीय वस्तूंचा समावेश आहे. या प्रदर्शनास प – पुरातत्वाचा असे नाव देण्यात आले होते. इतिहासातील गमती जमती इतिहासाच्या पाऊलखुणा समूहातील संकेत कुलकर्णी यांनी उलगडल्या.

प्राच्यविद्या अभ्यास संस्थेच्यावतीने कुंभमेळ्यातील अनुभव सांगणारे छायाचित्र प्रदर्शन मांडण्यात आले होते. यामध्ये कुंभमेळ्यातील राहण्याची सोय, १३ आखाडे तसेच नागासाधू यांची विस्तृत माहिती देणारे छायाचित्र होते.