ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये मुसळधार पावसादरम्यान झाडे उन्मळून पडण्याचे सत्र सुरूच असून आज (सोमवार) पहाटे कळव्यातील रस्त्यावर मोठे झाड पडल्याने कळव्यातून मुंब्र्याकडे जाणारा मार्ग वाहतूकीसाठी तीन तास वाहतूक बंद होता. पहाटेच्या वेळेत वाहनांची वर्दळ कमी असली तरी मार्ग बंद झाल्याने काही प्रमाणात कोंडी झाली होती. या घटनेत कुणीही जखमी झालेले नसले तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाच्या आवारातील ७ ते ८ झाडे धोकादायक स्थितीत आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात पावसादम्यान झाडे पडण्याचे सत्र सुरूच असून गेल्या चोवीस तासात ७ झाडे पडली तर ११ झाडाच्या फांद्या पडल्या. कळवा येथील खारेगाव भागातील राजदीप हॉटेल समोरील रस्त्यावरती पहाटे ४ वाजता मोठे झाड पडले. रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कारवर झाड पडून कारचे नुकसान झाले. त्याचबरोबर कळव्यातून मुंब्र्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती.
याबाबत माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी, टोरंट विद्युत विभागाचे कर्मचारी, कळवा वाहतूक पोलीस कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी घटनास्थळी धाव घेऊन झाड कापून बाजूला केले. तोपर्यंत म्हणजेच तीन तास हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होता. या मार्गावर पहाटेच्यावेळी फारशी वर्दळ नसते. तसेच बाजूच्या मार्गिकेवरून दोन्ही बाजूची वाहतूक सोडण्यात येत होती. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात ७ ते ८ झाडे धोकादायक स्थितीत आहेत. या झाडांची छाटणी अजूनही करण्यात आलेले नसून याबाबत आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे तक्रार प्राप्त झाली आहे.