Kokan, Traffic ठाणे – गणेशोत्सवाला अवघा एक दिवस शिल्लक राहिला असून त्यानिमित्ताने ठाणे, मुंबईकर कोकणाच्या दिशेने रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे शहरातून सोमवारी शेकडो एसटी बस गाड्या कोकणात सोडण्यात आल्या आहेत. यापैकी बहुतांश गाड्या शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नोंदणी केल्या होत्या. एकाच वेळी या गाड्या रवाना झाल्यामुळे या वाहनांचा भार शहरातील मुख्य तसेच अंतर्गत मार्गांवर आल्याने कोंडीत भर पडली.

ठाणे शहरात मोठ्यासंख्येने कोकणवासी नागरिक नोकरी आणि व्यवसायनिमित्त राहतात. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. या कोकणवासियांचा प्रवास सुरक्षित, आरामदायी आणि आनंदी व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनासह एसटी महामंडळाकडून ज्यादा गाड्यांचे नियोजन केले जाते.

यंदा गणेशोत्सव बुधवारी साजरा होणार असल्याने हजारो नागरिक आता कोकणाच्या दिशेने रवाना होऊ लागले आहेत. सोमवारी ठाणे शहरातून राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शेकडो बस गाड्या कोकणाच्या दिशेने रवाना केल्या. यामध्ये सर्वाधिक बस गाड्या या शिवसेना (शिंदे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सोडण्यात आल्या आहेत. या गाड्यांमधून ठाणे तसेच आसपासच्या शहरातील अनेकांनी कोकणात जाण्यासाठी प्राधान्य दिले. खेड, महाड, पाली, माणगाव, चिपळूण, गुहागर, देवरुख, रत्नागिरी, दापोली सिंधुदूर्ग या प्रमुख ठिकाणी या बस सोडण्यात आल्या आहेत.

ठाणे शहरातील लोकमान्य नगर, शास्त्री नगर, किसनगर, रामचंद्र नगर, ज्ञानेश्वर नगर, सावरकर नगर, खोपट, बाळकूम, कोपरी, नितीन कंपनी अशा विविध भागातून एसटी बस गाड्या सोडण्यात आल्या आहेत. ठाणे शहरात मागील काही दिवसांपासून वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच या बस गाड्यांचा भार वाढल्याने कोंडीत भर पडली आहे.

शहरातील अंतर्गत मार्गांवर वाहतूक कोंडी

ठाणे शहरातील विविध भागातून सोमवारी सायंकाळच्या वेळी मोठ्यासंख्येने या एसटी गाड्या सोडण्यात आल्यामुळे शहरातील वाहतूकीवर याचा फटका बसला. अरुंद रस्ते, रस्त्याच्या दुर्तफा उभी असलेली वाहने रस्त्यावरील खड्डे आणि त्यात या एसटी गाड्यांची वाहतूक यामुळे शहरातील अंतर्गत मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे.

वागळे इस्टेट येथे ज्ञानेश्वर नगर ते कामगार नाकापर्यंत रस्त्याच्या दुर्तफा बाजूला या एसटी बसगाड्या उभ्या करण्यात आल्या आहेत. तर, काही गाड्या या लोकमान्यनगर येथील टीएमटी आगारातून सोडण्यात येत आहे. त्यामुळे या भागात मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून पाच मिनीटाचे अंत पार करण्यासाठी १५ ते २० मिनिटे लागत आहे. यामुळे नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.